पुणे : अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या कुंटणखान्याला पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला असून, हा कुंटणखाणा तीन वर्षांसाठी सील करण्यात आला. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश काढले आहेत.
बुधवार पेठेतील नवीन बिल्डिंग येथील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये बांगलादेशातील अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्याप्रकरणी बबीता मोहम्मद शबीर शेख (वय ६१, रा. बुधवार पेठ), चंपा ऊर्फ विष्णुमाया दिनेश लामा (वय ५१, रा. नवीन बिल्डिंग, तिसरा मजला, बुधवार पेठ, मुळ रा. नेपाळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या कुंटण खान्याला सील करावे असा प्रस्ताव फरास खाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्फत पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार आयुक्तांच्या समोर सुनावणी झाली. त्यानंतर आयुक्तांनी अनैतिक व्यापार अधिनियमानुसार हा कुंटणखाना तीन वर्षासाठी सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फरासखाना पोलीसांनी नवीन बिल्डिंग येथील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला सील ठोकले आहे.