पुणे : ‘ई-बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाली असून, तिची तातडीने पुनर्बांधणी करण्यात येईल. तसा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यात सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, विक्रम काळे, किशोर दराडे यांनीही सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, बालचित्रवाणी अर्थात ई-बालभारतीची सध्या अस्तित्वात असलेली इमारत लोड बेअरिंग स्ट्रक्चरमध्ये बांधलेली आहे. या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार येथे नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे ही इमारत नव्याने बांधण्यासाठी लवकरच नियामक मंडळापुढे प्रस्ताव मांडून मान्यता घेतली जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केले जाईल.
‘एससीईआरटी’ आणि ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारचे धोरण आणि स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रम तयार केला जाईल तसेच ‘बालभारती’ने तयार केलेल्या वर्कबुक्सचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच "मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना" सादर करताना सांगितले की, राज्यभरातील वापरलेली पुस्तके आणि वह्या गोळा करून त्यांचा पुनर्वापर केला जाईल आणि त्यातून नवीन वह्या व पुस्तके विद्यार्थ्यांना कमी दरात उपलब्ध होतील. ज्या ठिकाणी ‘बालभारती’च्या मालकीच्या जागा आहेत, तेथे आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.