पुणे महापालिकेत जे घडलं, ते अपघातानं घडलं; मुख्यमंत्री असलं काम करत नाही- छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:52 IST2022-02-13T14:50:23+5:302022-02-13T14:52:05+5:30
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे फार काही दिवस टिकणार नाही.

पुणे महापालिकेत जे घडलं, ते अपघातानं घडलं; मुख्यमंत्री असलं काम करत नाही- छगन भुजबळ
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्यात १० मार्चनंतर सत्ताबदल होईल आणि भाजपाचे सरकार येईल, असं विधान केलं होतं. त्यानंतर शनिवारी पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे फार काही दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसेच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीवर सत्ता सोडण्याची वेळ येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
चंद्रकात पाटील यांच्या या विधानानंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी टोला लगावला आहे. 'जोशी भविष्य सांगायचे, पाटील कधीपासून सांगू लागले?' अशा शब्दात छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला होता. त्यावर भुजबळ यांनी मुख्यमंत्री असलं काम करत नाहीत. पुणे महापालिकेत जे घडलं ते अपघातानं घडलं, असं देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे.
सत्तेचा दुरुपयोग चालू आहे- चंद्रकांत पाटील
संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांचा सत्कार करून काल पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार असा आपला सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.