पुणे : दुष्काळ आणि चारा टंचाईमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीस काढत असल्याने जनावरांना भाव मिळत नाही. तर, दुसरीकडे दुधाचे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळातील दोनशे ते सव्वादोनशे कोटी रुपयांचे अनुदान सरकारने थकवल्याने काही दूध उत्पादक संघांनी उत्पादकांना कमी दर देण्यास सुरुवात केली आहे. सरकारने येत्या ११ डिसेंबरपर्यंत अनुदानाची रक्कम देण्याबाबत पावले न उचलल्यास सरकारच्या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. दुधाला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानीसह विविध शेतकरी संघटनांनी जुलै महिन्यात दूध बंद आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यामुळे दूध उत्पादकांना लिटरमागे २५ रुपयांचा भाव देण्यात येत होता. आॅगस्ट महिन्यात राज्य सरकारने सुमारे दीडशे कोटी रुपयांचे अनुदान दूध संघ व खासगी डेअरीला दिले. काही दूध उत्पादक संघांना सप्टेंबर महिन्याच्या दोन आठवड्यांचे अनुदान मिळाले आहे. त्यानंतर कोणालाच अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. शेट्टी म्हणाले, दुधाला अनुदान देण्यात राज्य सरकारकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे सोलापूर आणि अहमदनगर येथील दूध उत्पादक संघांनी २० रुपये लिटरप्रमाणेच उत्पादकांना पैसे देण्यास सुरुवात केली आहे. तर, उर्वरीत ५ रुपये सरकारचे अनुदान जमा झाल्यानंतर देण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. सरकार एकीकडे आमच्याकडे पुरेसा निधी असल्याचे सांगत आहे. उलट दूध उत्पादक संघच माहिती देत नसल्याने अनुदान रखडल्याचे सरकार म्हणते. मात्र, त्यांच्या या दाव्यात तथ्य वाटत नाही. दुष्काळाच्या स्थितीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीस काढत असल्याचे चित्र जनावरांच्या बाजारात दिसून येत आहे. मागणीच्या तुलनेत जनावरे विक्रीसाठी अधिक उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना किंमत मिळत नाही. तर सध्या दूधाचे चांगले उत्पादन होत आहे. त्यातच अनुदान मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. सरकारने वेळच्या वेळेत अनुदान न दिल्यास या योजनेतून बाहेर पडू असे शेट्टी म्हणाले.
दूध उत्पादकांचे सव्वादोनशे कोटी रुपयांचे अनुदान थकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 16:39 IST
दुधाला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानीसह विविध शेतकरी संघटनांनी जुलै महिन्यात दूध बंद आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान जाहीर केले.
दूध उत्पादकांचे सव्वादोनशे कोटी रुपयांचे अनुदान थकले
ठळक मुद्देकाही दूध उत्पादक संघांना सप्टेंबर महिन्याच्या दोन आठवड्यांचे अनुदानअनुदान मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक कोंडीत सरकारने वेळच्या वेळेत अनुदान न दिल्यास या योजनेतून बाहेर पडू : राजू शेट्टी