दूधाच्या दरात ७ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता; राजवर्धन पाटलांची राधाकृष्ण विखे पाटलांशी सकारात्मक चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:12 PM2023-11-20T20:12:58+5:302023-11-20T20:13:07+5:30

दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात प्रतिदिन १ लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे

Milk price likely to increase by Rs 7 Rajvardhan patil positive discussion with Radhakrishna Vikhe Patal | दूधाच्या दरात ७ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता; राजवर्धन पाटलांची राधाकृष्ण विखे पाटलांशी सकारात्मक चर्चा

दूधाच्या दरात ७ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता; राजवर्धन पाटलांची राधाकृष्ण विखे पाटलांशी सकारात्मक चर्चा

इंदापूर : राज्यात गडद चाललेली दुष्काळसदृश स्थिती, वाढलेल्या उत्पादनखर्चाच्या तुलनेत दुधाच्या दरात होत चाललेली घट या पार्श्वभूमीवर दुधगंगा दुधउत्पादक संघाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेवून सविस्तर चर्चा केली आहे. त्या चर्चेचे फलित म्हणून दूधाच्या दरात ७ रुपयांची वाढ होणार असल्याचे शुभवर्तमान समोर येत आहे.     

या संदर्भात राजवर्धन पाटील म्हणाले की, दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात प्रतिदिन १ लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे. दुधगंगामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या हजारो युवकांना रोजगार व व्यावसायिक हातभार लावण्यात व दुध व्यवसायाला चालना देण्यात दुधगंगा महत्वाची भूमिका बजावत आहे. दूध उत्पादकांच्या हातात जास्तीचा मोबदला देण्याचे काम दुधगंगाच्या माध्यमातून होत आहे.      

या पार्श्वभूमीवर दुष्काळसदृश स्थिती व दुधउत्पादन खर्चाच्या तुलनेत दरात होत असणा-या होणारी घट यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात आपण दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील ही त्यावेळी उपस्थित होते. झालेल्या सकारात्मक चर्चेत दुध दरवाढीच्या मुद्द्यासंदर्भात आपण आग्रही भूमिका घेतली,असे राजवर्धन पाटील यांनी सांगितले.     

या भेटीत झालेल्या चर्चेनुसार दूध दरवाढीच्या प्रश्नांवर मंगळवारी (दि.२१) दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून दूध दरात प्रति लिटर ७ रुपयांच्या वाढीबाबत निर्णय घेण्याबाबतची सकारात्मकता दर्शवली आहे असे राजवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Milk price likely to increase by Rs 7 Rajvardhan patil positive discussion with Radhakrishna Vikhe Patal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.