प्रदूषणमुक्तीसाठी मेट्रोचाच पर्याय
By Admin | Updated: March 23, 2017 04:21 IST2017-03-23T04:21:01+5:302017-03-23T04:21:01+5:30
वाढते शहरीकरण, त्याबरोबरच वाढणारी दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या, त्यातूनच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूककोंडी

प्रदूषणमुक्तीसाठी मेट्रोचाच पर्याय
पिंपरी : वाढते शहरीकरण, त्याबरोबरच वाढणारी दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या, त्यातूनच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूककोंडी, वायू, ध्वनिप्रदूषणही वाढत आहे. अशातच अनेक छोटे-मोठे अपघात होऊन कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. यासारख्या समस्यांतून सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासासाठी मेट्रो हाच पर्याय आहे, असे सांगत महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पुणे मेट्रो रेल कॉपोर्रेशनतर्फे आयोजित संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये मेट्रो संवाद कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध प्रश्न उपस्थित केले. हैदराबाद येथील एल अॅन्ड टी मेट्रो रेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ व पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमणियम यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला.
नव्वद किलोमीटर प्रतितास वेग या मेट्रोचा असणार आहे. परंतु, दोन स्टेशनमधील अंतर, मध्येच येणारी वळणे, ट्रेन सुरू करण्यासाठी आणि थांबविण्यासाठी लागणारा अवधी याचा विचार केल्यास पुणे मेट्रोचा वेग प्रतितास तीस ते पस्तीस किलोमीटर असणार आहे. प्रत्येक स्थानकादरम्यान उभारण्यात येणाऱ्या सोलर पॅनेलच्या साह्याने सुमारे ६५ टक्के सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.
दुचाकी, चारचाकी, खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला प्राधान्य द्यावे, प्रदूषण, अपघात, वाहतूककोंडी होऊ नये आदींसाठी मेट्रोचा वापर सर्वसमावेशक ठरणार आहे. नागरिकांनी, पर्यायाने सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ‘मेट्रो’चा वापर करावा, असे आवाहन गाडगीळ व सुब्रमणियम यांनी केले. प्रा. डॉ. दीपा जोशी यांनी आभार मानले.
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख डॉ. दीपा जोशी आदी उपस्थित होते.
पुणे मेट्रोचे काम कसे सुरु आहे याची माहिती नागरिकांना व्हावी, या कामामध्ये नागरिकांनी आपले योगदान, बहुमोल मत द्यावे, यासाठी मेट्रो संवादचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाची माहिती ही विद्यार्थ्यांना देण्यात आली. या वेळी दिल्लीमध्ये मेट्रोसाठी कोणत्या सुविधा दिल्या जातात. तसेच प्रवास कसा सुखकर होतो. याबाबतही अधिकाऱ्यांनीही सविस्तर माहिती दिली.
(प्रतिनिधी)