भर पावसात आणि तेही रात्री युध्दपातळीवर सुरु मेट्रोचे काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 05:11 PM2019-08-06T17:11:14+5:302019-08-06T18:12:56+5:30

वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी रात्री काम करण्यात येत असते.

Metro work continue in heavy rains and night | भर पावसात आणि तेही रात्री युध्दपातळीवर सुरु मेट्रोचे काम 

भर पावसात आणि तेही रात्री युध्दपातळीवर सुरु मेट्रोचे काम 

Next
ठळक मुद्दे१२ ते पहाटे ५ यावेळात सुरू वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या ३१ किलोमीटरच्या मार्गाचे चार भाग

पुणे : पावसामुळे इतरत्र कामे थंडावत असली तरी महामेट्रो कंपनीचे मेट्रो मार्ग तयार करण्याचे काम मात्र भर पावसात व तेही रात्री १२ ते पहाटे ५ यावेळात सुरू असते. पहाटे सगळी यंत्र रस्त्यावरून हलवून रस्ता मोकळा केला जातो. वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी रात्री काम करण्यात येत असते.
वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या सुमारे ३१ किलोमीटरच्या मार्गाचे कामाच्या सोयीसाठी म्हणून चार भाग केले आहेत. त्यातील वनाज ते सिव्हिल कोर्ट व सिव्हिल कोर्ट ते रामवाडी असे दोन भाग आहेत. पिंपरी चिंचवड ते बोपोडी व बोपोडी ते रेंजहिल कॉर्नर असे दोन भाग आहेत. याशिवाय रेंजहिल ते स्वारगेट असा ५ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. ते काम वेगळे केले आहे.
वनाज ते गरवारे महाविद्यालय हा सुमारे ५ किलोमीटरचा मार्ग डिसेंबर २०१९ ला सुरू करण्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे हे काम प्राधान्याने करण्यात येत आहे. ३० ते ३४ मीटरच्या अंतराने उभ्या असलेल्या खांबांवर मेट्रो मार्गाची उभारणी करण्याचे आव्हान मेट्रो अभियंत्यांपुढे आहे. या रस्त्यावर फार मोठ्या संख्येने वाहतूक आहे. त्यामुळे थोडाही अडथळा निर्माण झाला की लगेचच वाहतूककोंडी होते. त्यामुळेच खांबांमध्ये काँक्रिट टाकण्याचे, त्यावर कॅप बसवण्याचे, दोन खांबांच्या मध्ये सेगमेंट बसवण्याचे काम ठेकेदार कंपनी रात्रीच्या वेळेस करत आहे.
अवजड यंत्रांद्वारे ही सर्व कामे करण्यात येतात. काँक्रिट मिक्स करून ते गाडीतून आणण्यात येते. पाईपच्या साह्याने ते खांबांमध्ये ओतले जाते. सेगमेट म्हणजे सिमेंट काँक्रिटचे दोन खांबांच्या मधील गोलाकार तुकडेही प्री कास्ट म्हणजे दुसरीकडे तयार केले जातात. ते गाडीने कामाच्या ठिकाणी आणले जातात व यंत्राच्या साह्याने खांबावर चढवले जातात. या कामांसाठी लागणारी वाहने बरीच मोठी असल्याने दिवसा काम करणे शक्य नाही. त्यामुळे ही सर्व कामे रात्री १२ ते पहाटे ५ यावेळात केली जातात असे उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल मोहोळकर यांनी सांगितले. 
वनाज ते गरवारे महाविद्यालयाशिवाय अन्य मार्गांचे कामही रात्रीच्या वेळेसच सुरू असते. रात्री सर्व वाहने कामाच्या ठिकाणी आणली जातात. रस्ता बंद केला जातो. पहाटेच्या आधी सर्व वाहने पुन्हा रवाना केली जातात. गेल्या काही दिवसात रात्रीही जोराचा पाऊस सुरू आहे, मात्र तरीही पावसात सगळे काम सुरू आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर वनाज, आयडियल कॉलनी, आनंदनगर, नळस्टॉप व गरवारे महाविद्यालय अशी ५ स्थानके असून त्यांचे काम दिवसा तसेच रात्रीही सुरू असते. 

Web Title: Metro work continue in heavy rains and night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.