पुणे : शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये लवकरच नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. दरम्यान, मेट्रोतून प्रवास करणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रोकडून दि. २५ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत, पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वन पुणे विद्यार्थी पास कार्ड’ (KYC) पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये विद्यार्थी समूहाचा एक मोठा वाटा आहे. ११८ रुपयाला (रु १०० रु १८ - GST) मिळणारे विद्यार्थी पास कार्ड आता या कालावधीत पूर्णपणे मोफत मिळणार आहे. परंतु, हे कार्ड घेताना सोबत किमान २०० रुपयांचा टॉपअप करणे अनिवार्य असणार आहे. या २०० रुपयांचा कार्ड घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे २०० रुपये टॉपअप मिळणार असून, त्यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या विशेष उपक्रमांत ‘विद्यार्थी पास कार्ड’ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान दररोज सर्व प्रवासावर ३० टक्के सवलत उपलब्ध असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल. पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, यामधील २९ स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९० पेक्षा जास्त असून, त्यात निरंतर वृद्धी दिसत आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल आणि पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी एक समाविष्ट आणि सहायक वातावरण निर्माण होईल. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आले आहे.
विद्यार्थी मोठ्या संख्येने मेट्रोचा वापर करताना दिसत आहेत. आता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. या काळात सर्व विद्यार्थ्यांनी मेट्रोचा पास घ्यावा, यासाठी ही विशेष सवलत योजना मेट्रोने आणली आहे. मेट्रो मार्गांवरील सर्व शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांनी व तेथील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. - श्रावण हार्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो