विधिमंडळात भाषा काय वापरली पाहिजे, याचे सदस्यांना भान राहिलेले नाही - डॉ निलम गोऱ्हे

By राजू हिंगे | Updated: March 28, 2025 21:11 IST2025-03-28T21:09:54+5:302025-03-28T21:11:47+5:30

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार याच्यासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल

Members are no longer aware of what language should be used in the legislature - Dr. Neelam Gorhe | विधिमंडळात भाषा काय वापरली पाहिजे, याचे सदस्यांना भान राहिलेले नाही - डॉ निलम गोऱ्हे

विधिमंडळात भाषा काय वापरली पाहिजे, याचे सदस्यांना भान राहिलेले नाही - डॉ निलम गोऱ्हे

पुणे : विधिमंडळात महिलांबाबत अपशब्द वापरण्यासारखे प्रकार झाले. विधिमंडळात हीन प्रवृत्तीची भाषणे ऐकली. काहींचा हिरोगिरी करण्याचा हेतू असू शकतो. मात्र, कोणत्या शब्दांचा वापर करू नये याचे भान नाही. याबाबत मतदारांनीच प्रश्न विचारले पाहिजे. काही लोकांनी गढूळ वातावरण केले आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. 

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार याच्यासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल. आताशी पहिला अर्थसंकल्प झाला आहे असून पाच अर्थ संकल्प आहेत, असे मिश्किलपणे सांगत लाडक्या बहिणींला २१०० रूपये अमुक एका वेळेला देऊ असे कोणीच सांगितले नव्हते. सरकारला ज्यावेळी शक्य होईल, त्यावेळी देतील असेही त्यांनी सांगितले. विधिमंडळाचे अधिवेशन ३ ते २६ मार्च या कालावधीत झाले. विधिमंडळात झालेल्या कामकाजाविषयी डॉ. गोऱ्हे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

त्या वाक्यावरून हक्कभंग दाखल होऊ शकतो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज्य ठाकरे यांनी आठ दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘एक काय घेऊन बसलात विधानसभेत सर्वच खोक्याभाई’ असल्याचे वक्तव्य केले होते. या वाक्यावरून हक्कभंग होऊ शकतो का, असे विचारले असता, त्या म्हणाल्या असता ‘हे विधान हक्कभंगासाठी पात्र होऊ शकते. जर कोणत्या आमदाराला ते वाटले, तर तो हक्कभंग दाखल करू शकतो.’ तर स्टँडअप कॉमेडीन कुणाल कामराबाबत बोलताना त्या म्हणाल्या,‘ओटीटी संदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत. मात्र, स्टँडअप कॉमेडी आणि ओटीटीबाबत राज्य सरकारचे धोरण नाही. स्टँडअपमध्ये महिलांबाबत असभ्य विनोद होतात. त्यामुळे या संदर्भात नियमावलीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

विधानपरिषदेत ११५ तास , विधानसभेत १४६ तास कामकाज

विधिमंडळ अधिवेशनात विधान परिषदेत १६ बैठका झाल्या. प्रत्यक्ष कामकाज ११५ तास ३६ मिनिटे झाले. रोज सरासरी ७ तास १३ मिनिटे कामकाज झाले. विधानसभेत १६ बैठक झाल्या. त्यात प्रत्यक्षात १४६ तास काम झाले. रोज सरासरी ९ तास ७ मिनिटे कामकाज झाले. विविध विषयांवर प्रश्नोत्तरे, चर्चा झाली. तसेच अहिल्याबाई होळकर जन्म त्रिशताब्दी, महिला पंचदशक पूर्तीनिमित्त ठराव राज्यघटनेला ७५ वर्षे या विषयावर ठराव करण्यात आले, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Web Title: Members are no longer aware of what language should be used in the legislature - Dr. Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.