निविदा काढूनच खरेदी करणार गणित प्रणालीचे साहित्य; टीकेची झोड उठल्यानंतर महापालिका ताळ्यावर
By राजू हिंगे | Updated: January 12, 2025 18:30 IST2025-01-12T18:23:25+5:302025-01-12T18:30:35+5:30
पुणे महापालिकेच्या शाळेमधील मुलांचे गणित पक्के व्हावे यासाठी एका संस्थेने अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणालीचे साहित्य तयार केले आहे

निविदा काढूनच खरेदी करणार गणित प्रणालीचे साहित्य; टीकेची झोड उठल्यानंतर महापालिका ताळ्यावर
पुणे : महापालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांचा गणिताचा पाया चांगला करण्यासाठी महापालिका एका संस्थेकडून अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणालीचे साहित्य विकत घेणार आहे. त्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविताच तब्बल १ कोटी ३४ लाखांचे काम या संस्थेस दिले जाणार होता. यासाठी निधी नसल्याने चक्क शिक्षण विभागाकडून पालिकेच्या शाळांमधील गुणवंत मुलांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतून हा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. पण यावर टीकेची झोड उठताच शैक्षणिक प्रणाली ही ठरावीक संस्थेकडून न घेता निविदा प्रक्रिया राबवून त्यानंतरच घेतली जाणार असल्याची भूमिका आता महापालिकेने घेतली आहे.
पुणे महापालिकेच्या शाळेमधील मुलांचे गणित पक्के व्हावे यासाठी एका संस्थेने अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणालीचे साहित्य तयार केले आहे. या साहित्यास एचसीआरटीने मान्यता दिली असून, राज्यातील काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यास हरकत नसल्याची शिफारसही केली आहे. त्यानुसार, शिक्षण मंडळास या शाळेने पत्र दिले होते.
राज्य शासनाच्या एका माजी मंत्र्यांकडेही याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार शासनाकडूनही महापालिकेस याबाबत पत्र प्राप्त झाले होते. या प्रणालीसाठीच्या शैक्षणिक साहित्याचा दर प्रती ५० मुलांसाठी १५३ रुपये ४० पैसे आहे. त्यानुसार, महापालिकेने पहिली ते आठवीच्या मुलांची संख्या अंदाजे ८८ हजार असून, या सर्वांसाठी संच घेण्याकरिता १ कोटी ३४ लाख ९९ हजार २०० रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला होता. त्यावरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. अखेर ही शैक्षणिक प्रणाली खरेदी करताना ठराविक संस्थेकडून न घेता निविदा प्रक्रिया राबवून याची खरेदी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.