भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; सुट्टीमुळे कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी नाही
By नारायण बडगुजर | Updated: January 12, 2025 22:35 IST2025-01-12T22:33:37+5:302025-01-12T22:35:50+5:30
भोसरी एमआयडीसी सेक्टर नंबर १० परिसरातील ऋषी पॉली बॉण्ड या प्लास्टिक मोल्डिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली.

भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; सुट्टीमुळे कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी नाही
पिंपरी : भोसरी एमआयडीसी सेक्टर नंबर १० परिसरातील ऋषी पॉली बॉण्ड या प्लास्टिक मोल्डिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. रविवारी (दि.१२) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली. कंपनीला सुट्टी असल्याने यामध्ये कोणत्याही स्वरूपाची जीवित हानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार भोसरी एमआयडीसी सेक्टर १० औद्योगिक परिसरात ऋषी पॉलि बॉण्ड या कंपनीला रविवारी सायंकाळी पावणे सात वाजता आग लागल्याची माहिती पिंपरी- चिंचवड महापालिका अग्निशामक दलाला मिळाली. अग्निशामक दल लागलीच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आगीने रौद्ररूप धारण केले होते. पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या सर्व केंद्रांसह पुणे महापालिका, पीएमआरडी, टाटा मोटर्स, बजाज कंपनीचेही बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे १५ ते २० बंब घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने कंपनीमध्ये एकही कामगार नव्हता. यामुळे जीवितहानी टळली. कंपनी ही पूर्ण बंदिस्त स्वरूपाची आहे. त्यामुळे कंपनीच्या आतमध्ये पाण्याचा मारा करणे अवघड ठरत आहे. तसेच कंपनीमध्ये प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील वस्तूसह काही केमिकल असल्याने आग भडकत असल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.