मास्क हीच आपली सध्याची लस : डॉ. तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:01 IST2020-11-29T04:01:59+5:302020-11-29T04:01:59+5:30

पुणे : “कोरोना होणार नाही. या भ्रमात कुणीही राहू नका. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो. कोव्हिड-१९ वर अजून ...

The mask is your current vaccine: Dr. Tatyarao Lahane | मास्क हीच आपली सध्याची लस : डॉ. तात्याराव लहाने

मास्क हीच आपली सध्याची लस : डॉ. तात्याराव लहाने

पुणे : “कोरोना होणार नाही. या भ्रमात कुणीही राहू नका. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो. कोव्हिड-१९ वर अजून लस यायची आहे. पण सध्यातरी मास्क हीच आपली लस आहे,” असे ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

कोरोनाची दुसरी लाट येणार का, असे सातत्याने विचारले जाते. जगात दुसरी लाट आली आहे. मग ती आपल्याकडे देखील येऊ शकते. मात्र ती कधी येईल हे कुणी सांगू शकत नाही. काळजी घेतली तर ती सौम्य प्रमाणात येईल. ती येऊ न देणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. लस निश्चित येईल. मात्र ती किती काळ आपल्या शरीरात राहील यासाठी ‘अँटीबॉडीज’चा अभ्यास सुरू असल्याचेही डॉ. लहाने म्हणाले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. लहाने यांना ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक हरी नरके, परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू एकनाथ खेडेकर, माजी आमदार जयदेव गायकवा आदी यावेळी उपस्थित होते.

“महात्मा फुले यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार घरचा पुरस्कार आहे. मला किडनी देऊन पुनर्जन्म देणारी आई आणि माझे रुग्ण यांच्यामुळेच मला हा सन्मान मिळाला आहे. काळ कोणताही असो आपल्याला चांगलं काम करता येते, हेच महात्मा फुले यांच्याकडून शिकता येते,” अशी भावना डॉ. लहाने यांनी व्यक्त केली.

कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे आपण जागरूक राहिले पाहिजे. दरवेळी नवनवी मार्गदर्शक तत्त्वे करून ती पोचवण्याचे काम सरकारने चांगल्या पद्धतीने केले आहे, असे डॉ. लहाने म्हणाले. डॉ. नागेश गवळी यांनी सूत्रसंचालन केले. पंढरीनाथ बनकर यांनी आभार मानले.

Web Title: The mask is your current vaccine: Dr. Tatyarao Lahane