पुणे : मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यात्रा जुन्नरच्या जवळ असताना हृदयविकाराच्या झटक्याने मराठा आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असं मृत्यूमुखी त्या पडलेल्या आंदोलकाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथील माती कपाळाला लावून मुंबईकडे प्रस्थान केले आहे. राज्यातील तमाम मराठा समाजाच्या तरुणांसह आरक्षणाची लढाई आरपार करण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. त्यासाठी ते काल (दि.२७) सकाळी अंतरवाली सराटी येथून हजारो वाहनांच्या संख्येने रॅलीद्वारे निघाले आहेत. आज(दि.२८) सकाळी त्यांची रॅली जुन्नर येथील किल्ले शिवनेरी जवळ दाखल झाली. रॅलीमधील असंख्य मराठा समाजाचे तरुण आपल्या वाहनातून मंचर मार्गे चाकणच्या दिशेने यायाल सुरुवात झाली आहे. यावेळी सतीश देशमुख त्या रॅलीमध्ये होते. त्यांना रॅलीमध्ये हृद्यविकाराचा झटका आला. आणि त्यांचा मृत्यू झाला आहे.
हजारो वाहनांच्या संख्येमुळे पुणे नाशिक आणि चाकण तळेगाव महामार्ग भगवामय झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संपुर्ण मार्गावर ठिकठिकाणी खेड तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने चहा, नाष्टा, जेवण, पाणी आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हजारो वाहनांच्या संख्येने महामार्गांवरील वाहतूक कोंडीचा फटका बसू नये म्हणून चाकण व आजूबाजूच्या परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.तसेच औद्योगिक क्षेत्रातील बसेस आणि अवजड वाहने या मार्गांवर यांना मज्जाव करण्यात आला आहे.या वाहनांना पर्यायी मार्गात बदल करण्यात आला आहे.