Maratha Kranti Morcha: माझी भूमिका नेतृत्वाची नव्हे, समन्वयकाची- संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 05:01 IST2018-08-05T05:00:58+5:302018-08-05T05:01:42+5:30
मराठा आरक्षणाकरिता निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करण्यापेक्षा समन्वयकाची भूमिका पार पाडण्यास मी प्राधान्य देईल, असे खासदार संभाजीराजे यांनी एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांना सांगितले.

Maratha Kranti Morcha: माझी भूमिका नेतृत्वाची नव्हे, समन्वयकाची- संभाजीराजे
पुणे : मराठा आरक्षणाकरिता निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करण्यापेक्षा समन्वयकाची भूमिका पार पाडण्यास मी प्राधान्य देईल, असे खासदार संभाजीराजे यांनी एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांना सांगितले. आरक्षणाबाबतच्या चर्चेकरिता मुख्यमंत्र्यांकडून कुठलेही निमंत्रण आले नसून ते आल्यास चर्चेला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकल मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने खासदार संभाजीराजे यांनाही समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नेतृत्वासाठी मुख्यमंत्र्यांकडून दुजोरा देण्यात आला असला तरी त्यांच्याकडून कुठलेही निमंत्रण आलेले नाही. यापुढील काळात त्यांच्याशी थेट चर्चा करण्यावर भर देणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
नेतृत्त्व सामूहिकच
असावे - विनायक मेटे
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व सामूहिकच असले पाहिजे, असे शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रमाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पुण्यात शनिवारी झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.
>चाकण हिंसाचार; आणखी बारा जणांना अटक
चाकण : मराठा आरक्षण आंदोलनावेळी चाकण येथील जाळपोळ व हिंसाचाराचा तपास स्थानिक अन्वेषण विभागाकडे वर्ग केल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
सोमवारी झालेल्या जाळपोळ, तोडफोड, हिंसाचार प्रकरणी शुक्रवारी पाच जणांना अटक केल्यानंतर रात्री उशिरा आणखी सात अशी एकूण बारा जणांना अटक झाली. तीन दिवसांत अटक केकेल्यांची संख्या ३० झाली आहे.