विद्यार्थिनींच्या छळवणुकीच्या अनेक कहाण्या
By Admin | Updated: March 22, 2015 00:44 IST2015-03-22T00:44:31+5:302015-03-22T00:44:31+5:30
घरी आई-वडिलांकडून मारहाण केली जाते... शाळेबाहेर टोळके त्रास देते... शिक्षक छेडछाड करतात... मित्र-मैत्रिणींकडूनच दुजाभाव केला जातो... व्यसनी मित्रांची संगत... अभ्यासात कमी...

विद्यार्थिनींच्या छळवणुकीच्या अनेक कहाण्या
पुणे : घरी आई-वडिलांकडून मारहाण केली जाते... शाळेबाहेर टोळके त्रास देते... शिक्षक छेडछाड करतात... मित्र-मैत्रिणींकडूनच दुजाभाव केला जातो... व्यसनी मित्रांची संगत... अभ्यासात कमी... यांसह विविध प्रकारच्या तक्रारी शाळकरी मुला-मुलींच्या असतात. त्यातून काही जण खेळण्या-बागडण्याच्या या वयात आपल्या इच्छा-अपेक्षांना मुरड घालतात. अबोल होतात. एकटे-एकटे राहतात. अनेकदा शाळेत शिक्षक आणि घरी आई-वडिलांकडूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. कधी कधी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते. मग अशा वेळी अनेक विद्यार्थ्यांना आधार मिळतो तो समुपदेशकांचा. महापालिकेच्या शाळांमधील समुपदेशकांनी अशा अनेक मुला-मुलींना आपल्या कौशल्याने समस्यांतून बाहेर काढून त्यांच्यात सकारात्मकतेची बीजे रुजविली आहेत.
महापालिका शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमांच्या ३०६ शाळा असून, त्यांमध्ये सुमारे १ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने व्यक्तित्व विकास प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून ५५ समुपदेशकांची नेमणूक केली आहे. हे समुपदेशक पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतचे त्यांचे नाते दृढ झाले आहे. त्यांना बहुतेक विद्यार्थ्यांची गुणवत्ता, सवयी, समस्या माहीत आहेत. त्यामध्ये अचानक बदल दिसू लागल्यानंतर ही बाब समुपदेशकांच्या नजरेत लगेच भरते. मग खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला सुरुवात होते.
प्रबोधिनीचे समन्वयक पवन गायकवाड म्हणाले, ‘‘प्रत्येक समुपदेशक दररोज ७ तास काम करतो. हे समुपदेशन ३ टप्प्यांत असते. वैयक्तिक समुपेशन, गट समुपदेशन आणि बुद्धिमत्ता चाचणी याद्वारे
मुला-मुलींशी संवाद साधला जातो. एकदा समुपदेशन करून समस्या सुटत नाहीत. त्या विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून पाठपुरावा करावा लागतो. मुली सहजासहजी बोलत नाहीत. मग कधी कधी त्यांच्या पालकांशीही बोलावे लागते. काही पालक त्याला प्रतिसाद देत नाहीत. मुलांना असलेली व्यसने, शाळेत सतत गैरहजर राहणे, खोडी काढणे, वागणे नीट नसणे अशा काही मुलांच्या तक्रारी असतात. त्या उघडपणे दिसतात; मात्र काही समस्या विशेष:त मुलींबाबत त्यांच्याशी थेट बोलावेच लागते. अनेक केसमध्ये गंभीर समस्या असल्याचे जाणवते.
समुपदेशक वाढविण्याची गरज
४पालिका शाळांमधील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांसाठी केवळ ५५ समुपदेशक आहेत.
४विद्याथ्र्सििंख्या जास्त असल्याने काम पूर्ण क्षमतेने करता येत नाही.
४किमान १०० समुपदेशकांची गरज आहे. तरच, समुपदेशन अधिक परिणामकारक होईल, असे पवन गायकवाड यांनी सांगितले.
४माहिती तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले; मात्र या विस्फोटाने पालक, शिक्षक व मुलांमधील संवाद नाहिसा होत चालला आहे. याचा थेट परिणाम मुला-मुलींच्या भावनिक विश्वावर होळ लागला आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांना आपुलकीची साद घालणे गरजेचे बनले आहे.
४विद्यार्थ्यांना अनेक समस्या असतात. त्या समस्या जाणून घेत कौशल्याने विद्यार्थ्यांना बोलते करणे समुपदेशकांपुढे आव्हान असते. कारण शाळेतील मुले भीतीने किंवा इतर कारणांनी फारशी बोलत नाहीत. त्यातून गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. समुपदेशक आपल्या कौशल्याने त्यांना बोलते करतात.
यासाठी गरजेचे आहे समुपदेश
पालिकेच्या एका शाळेत शिकणारी मुलगी नियमितपणे शाळेत यायची; पण अचानक शाळा सुटण्याची वेळ आली, की घाबरून जाऊ लागली. एरवी मुुले-मुली शाळा सुटण्याची वाट बघतात. ही मात्र अबोल व्हायची. मैत्रिणींशीही फारशी बोलत नसे. काही दिवसांनी समुपदेशकांच्या लक्षात ही बाब आली. एक दिवस त्यांनी तिला बोलावून घेऊन तिच्याशी संवाद साधला. तिची समस्या जाणून घेतली, तेव्हा त्या मुलीने खरे कारण सांगितले. शाळा सुटण्याच्या वेळी एक मुलगा दररोज शाळेबाहेर उभा असायचा. ती शाळेबाहेर आली, की तो ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे म्हणायचा. दररोज काही ना काही बोलायचा. त्यामुळे ती घाबरली होती. तिच्याशी जवळीक साधून समुपदेशकांनी समजूत काढली आणि त्याला ठामपणे नकार देण्यास सांगितले. त्यासाठी तिची मानसिक तयारीही करून घेतली. त्या दिवसानंतर तो मुलगाही शाळेबाहेर दिसला नाही आणि ती मुलगीही मोकळेपणाने वावरू लागली.
तिची आई बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. त्यामुळे ती मुलगी वडिलांसोबत राहायची. दररोज शाळेत हसत-खेळत असायची; पण काही दिवसांपासून तिच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवू लागला. ती अबोल झाली होती. एक दिवस तिने शाळेच्या गच्चीवरून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. शाळेतील समुपदेशकांनी तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरूवातीला तिने काहीच सांगितले. विश्वास घेतले तेव्हा ती बोलू लागली आणि सर्वांनाच धक्का बसला. वडीलच अश्लील चाळे करतात, असे तिने सांगितले. पण, घाबरून जाऊन तिने कुणालाही सांगितले नव्हते. शेवटी वडिलांना शाळेत बोलावण्यात आले. समुपदेशकांनी त्यांचेही समुपदेशन केले. त्यांच्या कृत्याची जाणीव करून दिली. त्यानंतर हा प्रकार बंद झाला.