महाराष्ट्रात यंदा देखील पोलीस भरती प्रक्रियेत अनेक समस्या; भरतीची तयारी करणार्या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 23:49 IST2025-11-03T23:49:18+5:302025-11-03T23:49:43+5:30
यामधील मुंबई व यवतमाळ या दोन जिल्ह्यामध्येच सामाजीक आरक्षणानुसार प्रवर्गासाठी उपलब्ध जागांची सविस्तर माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात यंदा देखील पोलीस भरती प्रक्रियेत अनेक समस्या; भरतीची तयारी करणार्या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण
बारामती : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये १५२९४ पदांची ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या भरती प्रक्रियेत पोलीस बॅन्ड्स्मन तसेच अनाथ या घटकांच्या जाहीरातीमध्ये प्रत्यक प्रवर्गासाठी असणाऱ्या सामाजीक आरक्षणानुसार जागांची स्पष्टता नसल्यामुळे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सध्या सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत बॅन्डस्मन पदासाठी मुंबई, यवतमाळ, पुणे शहर, सोलापूर शहर, छत्रपती सभाजीनगर ग्रामीण, वाशीम आणि गोंदिया अशा एकूण सात घटकात जागा देण्यात आल्या आहेत. यामधील मुंबई व यवतमाळ या दोन जिल्ह्यामध्येच सामाजीक आरक्षणानुसार प्रवर्गासाठी उपलब्ध जागांची सविस्तर माहिती दिली आहे. परंतु उर्वरीत पाच जिल्ह्यांत केवळ जागांची संख्या दिली आहे. त्यामध्ये प्रवर्ग निहाय उपलब्ध जागांचा उल्लेख नसल्याने अर्ज भरतांना उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
तसेच बॅन्ड पोलीस भरती प्रमाणेच अनाथांना ही जाहीरातीमध्ये सामाजीक आरक्षणानुसार कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहे. याबाबत स्पष्टता दिली नसल्यामुळे उमेदवारांमध्ये दरवर्षी प्रमाणे संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी अंतिम निकाल लागल्यानंतरच अनाथाच्या १ टक्के आरक्षणानुसार कोणत्यातरी एका समाजिक प्रवर्गातील एक,दोन जागा कमी करून त्या अनाथांना दिल्या जातात. त्यामुळे ज्या प्रवर्गाच्या जागा अनाथाला दिल्या जातात. त्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होतो.
याबाबत बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की, याबाबत आम्ही गृहमंत्री, गृहसचिव त्याचबरोबर अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांना यापुर्वी अनेकदा ई-मेल केले आहेत. तरी बॅन्डस्मन व अनाथ या घटकांच्या जाहिराती प्रसिध्द करतांना सामाजीक आरक्षणानुसार जागांचा तपशील देण्याबाबत गृह विभागाने विशेष दखल घ्यावी. पोलीस भरती अर्ज करताना किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे.
ही वयोमर्यादा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे ३० नोव्हेंबर पर्यंत १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना अर्ज करता येतील असे दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्याही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्ष अर्ज भरताना ज्या उमेदवरांचे वय १ जानेवारी २०१५ ला १८ पूर्ण झाले, फक्त त्यापर्यंतच्याच उमेदवारांनाचे अर्ज स्विकृत होत आहेत. त्यानंतर ३० नोव्हेंबर पर्यंत १८ वर्ष पुर्ण झालेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकृत होत नाहीत. ही एक गंभीर तांत्रिक त्रुटी असल्यामुळे उमेदवरांमध्ये नाराजी आहे, तरी प्रशासनाने लवकरात लवकर यामध्ये दुरूस्त करावी,असे रुपनवर म्हणाले.