लोणावळ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जंगी स्वागत; चिक्की भरवून केले तोंड गोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 18:36 IST2024-01-27T18:36:32+5:302024-01-27T18:36:59+5:30
लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. तसेच परतीच्या मार्गावर असलेल्या सकल मराठा समाजाला चिक्की वाटप करण्यात आली...

लोणावळ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जंगी स्वागत; चिक्की भरवून केले तोंड गोड
लोणावळा (पुणे) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मागणी मान्य झाल्यानंतर वाशी या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळत जल्लोष साजरा करत अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेले मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे-पाटील यांचे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा येथे सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीण यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. तसेच परतीच्या मार्गावर असलेल्या सकल मराठा समाजाला चिक्की वाटप करण्यात आली.
मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य करत तसा अध्यादेश त्यांच्या हाती शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुपुर्द केला. या अभूतपूर्व यशाचे जल्लोषात वाशी या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून आलेला लाखो मराठा समाज बांधव पुन्हा माघारी निघाले आहेत. त्यांच्याकरिता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग खुला करून देण्यात आला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे-पाटील यांचे लोणावळ्यात एक्स्प्रेस वेवरून आगमन झाले. वलवण या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की त्यांना भरवत त्यांचे तोंड गोड करण्यात आले. सोबतच या मार्गावरून जाणाऱ्या मराठा बांधवांना चिक्की वाटप करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या या संघर्ष योद्ध्यावर आम्ही जीवदेखील ओवाळून टाकू, अशा शब्दांत सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दर्शविला. तसेच एकमेकाला चिक्की भरवत व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला.