फळांचा राजा आंबा यंदा देशभर जोशात; महाराष्ट्र आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 12:25 IST2021-03-20T04:09:53+5:302021-03-20T12:25:13+5:30
राजू इनामदार पुणे : फळांचा राजा असलेला आंबा यंदा देशभर जोरात आहे. मँगोनेट या निर्यातीसाठी आवश्यक संकेतस्थळावर देशातून ३३ ...

फळांचा राजा आंबा यंदा देशभर जोशात; महाराष्ट्र आघाडीवर
राजू इनामदार
पुणे : फळांचा राजा असलेला आंबा यंदा देशभर जोरात आहे. मँगोनेट या निर्यातीसाठी आवश्यक संकेतस्थळावर देशातून ३३ हजार ५१३ आमरायांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र त्यात आघाडीवर असून, राज्यातून ११ हजार ४७० आमराया नोंदल्या गेल्या आहेत.
यात हापूस व केशर या दोनच वाणांच्या आमराया सर्वाधिक आहेत. मँगोनेट हे केंद्र सरकारच्या अँपेडा या निर्यात प्रोत्साहनासाठी स्थापन केलेल्या संस्थेने विकसित केलेले संकेतस्थळ आहे. त्याचे संचलन राज्याच्या कृषी निर्यात कक्षातून होते.
निर्यात कक्षाचे सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले की, मँगोनेटमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबरोबरच स्थानिक बाजारपेठेतही उत्तम गुणवत्तेचा आंबा उपलब्ध होण्यास मदत होत आहे. यात ग्राहकांचाही फायदा आहे. प्रत्येक आंबा उत्पादकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आदी माहिती मँगोनेटवर आहे. ग्राहक त्यातून थेट उत्पादकाबरोबर संपर्क साधू शकतात.
गेल्या वर्षी राज्यातून साडेसात हजार आमरायांची नोंद मँगोनेटवर झाली होती. या वर्षी ही संख्या ११ हजार ४७० आहे. देशातून मागील वर्षी ६० हजार टन आंबा निर्यात झाला. त्यात राज्याचा वाटा ४५ हजार टन होता. यंदा जास्त आमरायांची नोंदणी झाल्याने निर्यातीत वाढ अपेक्षित आहे. प्रामुख्याने अरब देश, युरोप आणि अमेरिकेत भारतीय आंबा निर्यात होतो.
चौकट
‘मँगोनेट’वर नोंदलेल्या आमरायांची संख्या
महाराष्ट्र - ११,४७०
कर्नाटक- ९,६५५
आंध्र - ७,७६२
गुजरात - २,४४३
तेलंगणा - १,७७३
उत्तर प्रदेश - २९६
केरळ -११३
तामिळनाडू - ७१
बिहार - १०
चौकट
महाराष्ट्रात रत्नागिरी अव्वल (कंसात आमरायांची संख्या)
रत्नागिरी (७,०५२), रायगड (१,८६३), सिंधुदुर्ग (१,५००) या तीन जिल्ह्यांमधून सर्वाधिक निर्यातक्षम आमरायांची नोंदणी झाली आहे. या व्यतिरिक्त पुणे (१५०), सोलापूर (१५३), नाशिक (११९), पालघर (११७), सांगली (८५), ठाणे (९१), नगर (६०), भंडारा (७७), उस्मानाबाद (६१), सातारा (२८), औरंगाबाद (२४), कोल्हापूर (२७), लातूर (१७), नांदेड (११), नागपूर (८), जालना (७), गडचिरोली (९), गोंदिया (५), चंद्रपूर (५), बुलडाणा (४), वर्धा (२), वाशिम आणि जळगाव (प्रत्येकी एक) या जिल्ह्यातून आमरायांची नोंदणी झाली आहे.
.......
३१ मार्चपर्यंत नोंदणी
“मँगोनेटवर आमराईची नोंदणी करण्याची मुदत ३१ मार्च आहे. नोंदणी केल्याने उत्पादनाची जगभर ओळख निर्माण करता येते. उत्पादन पसंत पडल्यास दरवर्षीची कायमस्वरूपी बाजारपेठ मिळते. त्यामुळे आंबा उत्पादकांनी त्वरेने मँगोनेटवर नोंदणी करावी.”
- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, कृषी विभाग