पुणे : कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली तुळशीबाग आणि मंडई शुक्रवारी सुरु करण्यात आली. त्यामुळे पुणेकरांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. तुळशीबाग व मंडई सुरु करण्यास परवानगी दिली गेली असली तरी कोरोनाचा शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फिजिकल डिस्टंन्सिंगसह सरकार व महापालिका प्रशासनाच्या आदेश व नियमांचे पालन करणे दुकानदार व नागरिकांना बंधनकारक असणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमधून दिलासा देत महापालिकेने आणखी एक निर्णय घेतला असून महात्मा फुले मंडई आणि तुळशीबाग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शुक्रवारपासून मंडईमधील २०० गाळे आणि तुळशीबागेतील दुकाने सुरू झाली आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानांचे परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. महात्मा फुले मंडईमधील २०० गाळे धारकांनी महापालिकेकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांना प्रशासनाने फिजिकल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करणे, सॅनिटायझेशन आदी नियमांचे पालन करण्याच्या अटी घालून परवानगी दिली आहे. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पट्टे आखून देण्यात आले आहेत.