Manchar Nagar Parishad Election Result 2025: मंचरमध्ये शिंदेंसेनेचा गुलाल; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजश्री गांजाळे विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:42 IST2025-12-21T13:42:07+5:302025-12-21T13:42:35+5:30
नगरसेवक पदाच्या 17 पैकी 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकूनही गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे. तीन अपक्ष उमेदवार निवडून आले असून उबाठा व शरद पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

Manchar Nagar Parishad Election Result 2025: मंचरमध्ये शिंदेंसेनेचा गुलाल; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजश्री गांजाळे विजयी
मंचर: मंचर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या राजश्री दत्तात्रय गांजाळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. नगरसेवक पदाच्या 17 पैकी 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकूनही गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला तीन जागा मिळाल्या आहे. तीन अपक्ष उमेदवार निवडून आले असून उबाठा व शरद पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
प्रथमच स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री दत्तात्रय गांजाळे विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मोनिका सुनील बाणखेले यांचा 210 मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार प्राची आकाश थोरात यांनी लक्षवेधी लढत दिली. गांजाळे यांना 4135, बाणखेले यांना 3925 तर अपक्ष प्राची थोरात यांना 3224 मते मिळाली आहेत. प्रभाग एक मधून राष्ट्रवादीच्या वंदना कैलास बाणखेले बिनविरोध निवडून आल्या आहेत. आज झालेल्या मतमोजणीत 16 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग 2 मधून उर्मिला प्रवीण मोरडे, प्रभाग 5 मधून संदीप माधव थोरात, प्रभाग 8 मधून मीर इमरानअली इब्राहिमअली, प्रभाग 11 मधून धनेश देवराव मोरडे, प्रभाग 12 मधून मालती जितेंद्र थोरात, प्रभाग 15 मधून माणिक संतोष गावडे, प्रभाग 16 मधून पल्लवी निलेश गांजाळे तर प्रभाग 17 मधून बेबी दौलत थोरात हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले.
प्रभाग 4 मध्ये शिवसेनेचे विकास शांताराम जाधव तर प्रभाग 9 मधून शेख अंशरा अल्ताफ या विजयी झाल्या आहेत. प्रभाग 3 मध्ये शिवसेनेचे उमेदवार लक्ष्मण मारुती पारधी व भाजपाच्या उमेदवार ज्योती संदीप बाणखेले यांना समान 223 मते मिळाल्यानंतर चिठ्ठी टाकून निकाल देण्यात आला. त्यामध्ये शिवसेनेचे लक्ष्मण मारुती पारधी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
प्रभाग 10 मध्ये चुरशीची लढत झाली त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत विष्णू बाणखेले 333 मते मिळवून विजयी झाले आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी करत अपक्ष लढलेले शिवाजी गणपत राजगुरू हे प्रभाग 7 मधून तर सोनाली विकास बाणखेले या प्रभाग 14 मधून विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अंजली निलेश बाणखेले या प्रभाग 13 मधून विजयी झाल्या. तर अपक्ष उमेदवार रविकिरण दिनकर आवळे यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून विजयी होत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा उमेदवारांना पराभूत केले. विजयी उमेदवारांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.