पुणे : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा भागात असलेल्या एका खासगी कंपनीतून चोरट्यांनी ३ लाख ३४ हजार रुपयांचे यंत्र, तसेच साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी एकाला अटक केली.
याप्रकरणी संजय शंकर जमादार (रा. सिंहगड रस्ता) याच्यासह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुकेशकुमार ददानीराम मिश्रा (रा. नांदेड फाटा) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा यांची नांदेड फाटा परिसरात खासगी कंपनी आहे. आरोपी जमादार आणि साथीदारांनी कंपनीतील पत्रा उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी ब्लोअर, ड्रिल, ग्राईंडर तसेच अन्य साहित्य चोरून नेले. मिश्रा यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून जमादार याला ताब्यात घेतले. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.