पुण्यात अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड; पर्वती, पद्मावती विभागात चक्राकार भारनियमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 13:14 IST2020-10-10T13:14:18+5:302020-10-10T13:14:54+5:30
सुमारे २ लाख ६० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पुण्यात अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड; पर्वती, पद्मावती विभागात चक्राकार भारनियमन
पुणे(धायरी): महापारेषणच्या नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्राला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागातील ८२ वीजवाहिन्यांवर शनिवारी (दि. १०) सकाळी ८-३५ वाजेपासून चक्राकार पद्धतीने दोन ते अडीच तासांचे विजेचे भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे २ लाख ६० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ते जेजुरी या ४००केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड झाला व वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे जेजुरी ते कोयना टप्पा क्र. ४ या २२० केव्ही अतिउच्चदाब वाहिनीचा व त्यावरील नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्राचा देखील वीजदाब कमी झाला. या उपकेंद्रातील कमी वीजदाबामुळे महावितरणचे पर्वती व पद्मावती विभागातील सुमारे १५ उपकेंद्र आणि ८२ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, सर्वच ठिकाणी भारव्यवस्थापन शक्य नसल्याने नाईलाजास्तव सिंहगड रोड, धायरी, वडगाव, हिंगणे, किरकिटवाडी, आंबेगाव, बिबवेवाडी, धनकवडी, शांतीनगर, कात्रज, आंबेगाव, बालाजीनगर आदी परिसरात सध्या दोन ते अडीच तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
सिंहगड रस्ता परिसरात भर दुपारी भारनियमन केल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले असून ' वर्क फ्रॉम होम ' करणाऱ्या नोकरदारांना काम करताना व्यत्यय निर्माण होत आहे.