Pune Bus Accident: लोकमत न्यूज नेटवर्क, कोथरूड: आज सायंकाळी सातच्या सुमारास चांदणी चौक परिसरात गंभीर अपघात घडला. MH 12 KQ 0683 या क्रमांकाच्या PMPML बसने ब्रेक फेल झाल्यामुळे पाच वाहनांना जोरदार धडक दिली. हा अपघात चांदणी चौक परिसरात भुसारी कॉलनी भागात घडल्याने मोठी खळबळ उडाली. बसमध्ये व अपघात झालेल्या ठिकाणी वाहनांमध्ये कोणीही नागरिक नसल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी पाटी असलेली बस चांदणी चौक मार्गे कोथरूड डेपोच्या दिशेने वेगात जात होती. चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रेक न लागल्याने बसने पुढे उभ्या असलेल्या एक चारचाकी, दोन दुचाकी आणि दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातात काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. दोन दुचाकीस्वार, एका रिक्षाचालकासह काही लोक किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आलं आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून बसच्या ब्रेक प्रणालीतील बिघाडामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघाताचा अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.