माणला होणार मेट्रोच्या बोगींची देखभाल दुरुस्ती; १३ हेक्टरवरील कार डेपाेमध्ये रुळांचे काम सुरू
By नारायण बडगुजर | Updated: September 15, 2023 15:59 IST2023-09-15T15:59:09+5:302023-09-15T15:59:39+5:30
पीएमआरडीएमार्फत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन - ३ या २३.२०३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाचे काम सुरू आहे...

माणला होणार मेट्रोच्या बोगींची देखभाल दुरुस्ती; १३ हेक्टरवरील कार डेपाेमध्ये रुळांचे काम सुरू
पिंपरी : हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणेमेट्रो लाइन तीनच्या मुळशी तालुक्यातील माण येथील कार डेपोमधील विविध कामांना सुरूवात झाली आहे. यात गुरुवारी कारडेपोमधील रुळांचे काम सुरू करण्यात आले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मेट्रो लाइन तीनच्या मुख्य अभियंता अधीक्षक रिनाज पठाण आदी उपस्थित होते.
पीएमआरडीएमार्फत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन - ३ या २३.२०३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, चालवा व हस्तांतरित करा, (डीबीएफओटी) या तत्वावर सार्वजनिक खासगी सहभागाने (पीपीपी) करण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्य शासनाने महत्वपूर्ण नागरी प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.
महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी गुरुवारी कार डेपो येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी डेपोमधील विविध कामांचा आढावा घेतला. तसेच, डेपोमधील रुळांच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. डेपोच्या इमारतीच्या छतासाठी ७५० मेट्रिक टन इतके लोखंड वापरण्यात येणार आहे.
माण येथे १३ हेक्टरमध्ये उभारणार डेपो-
मुळशी तालुक्यातील माण येथे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेसाठी मोठा कार डेपो उभारण्यात येत आहे. त्यासाठी १३.२ हेक्टर आर जागेचे संपादन केले आहे. या डेपोमध्ये मेट्रोच्या बोगीची देखभाल-दुरुस्ती होणार आहे. टेस्ट ट्रॅकसह मेट्रोच्या बोगी धुणे, बोगींची तपासणी करणे आदी कामे येथे होणार आहेत. येथे कार्यशाळेची उभारणी होणार आहे.