दर कमी करण्याचा महावितरणचा वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव
By नितीन चौधरी | Updated: January 24, 2025 20:56 IST2025-01-24T20:54:27+5:302025-01-24T20:56:03+5:30
महावितरणला पुढील पाच वर्षांसाठी दर पुनर्रचनेतील बदलासाठीचा प्रस्ताव आयोगाकडे द्यावा

दर कमी करण्याचा महावितरणचा वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव
पुणे : महावितरणने पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा देत ५० ते ६० रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिला आहे. तर २०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी जवळपास समान दर ठेवण्याचा प्रस्ताव असल्याने एकंदरीतच महागाईतही महावितरणने सुखद धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषिपंप व घरगुती वापरासाठीही सौरऊर्जेचा वाढता वापर यातून सुमारे २ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत असल्याने महावितरणचा खर्च कमी झाला आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर हा निर्णय १ एप्रिलनंतर लागू करण्यात येणार आहे.
महावितरणला पुढील पाच वर्षांसाठी दर पुनर्रचनेतील बदलासाठीचा प्रस्ताव आयोगाकडे द्यावा लागतो. त्यानुसार महावितरणने २०२९-३० पर्यंतच्या पाच वर्षांसाठीच्या दर पुनर्रचनेचा प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे. यात २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे.
सध्या लघुदाब ग्राहकांसाठी १०० युनिटपर्यंत वीज वापर असल्यास ८९० रुपये वीजबिल येते. नव्या प्रस्तावात या ग्राहकांना दिलासा देत त्यांचे मासिक वीजबिल ५० ते ६० रुपयांनी कमी होणार आहे. हे बिल आता ८३० रुपयांपर्यंत खाली येणार आहे. तर १०१ ते २०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकांनाही दिलासा देत केवळ १.५ ते २ टक्के दरवाढ अर्थात केवळ २० रुपयांची किरकोळ दरवाढ सुचविण्यात आली आहे. प्रत्यक्षात हा वीजवापर असणाऱ्या बहुतांश ग्राहकांना वीजबिलात कोणताही फरक नसेल. त्यामुळे महावितरणने अनेक वर्षांत वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदाच सादर केला आहे.
कृषिपंपांसाठीही सौर वीज वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर वीज वाचत आहे. महावितरणमधील सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे २ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेतून मिळत असल्याने खर्चावरील मोठा ताण कमी झाला आहे. ही वीज केवळ ३ रुपये प्रतियुनिट या दराने मिळत आहे. सौरऊर्जेचा वापर वाढणार असल्याने भविष्यात महावितरणचा खर्चही कमी होणार आहे. परिणामी आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात दरवाढीऐवजी दर कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महावितरणने अनेक वर्षांत वीज दरवाढ नव्हे, तर वीजबिल कमी करण्यासाठीचा प्रस्ताव देत सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. याचे स्वागतच आहे. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच