Maharashtra TAIT Exam Result | टेट परीक्षेचा निकाल जाहीर; २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी दिली परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 12:28 IST2023-03-25T12:27:41+5:302023-03-25T12:28:32+5:30
परीक्षा दिलेल्या २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अपलाेड करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू हाेते...

Maharashtra TAIT Exam Result | टेट परीक्षेचा निकाल जाहीर; २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी दिली परीक्षा
पुणे :शिक्षक अभियाेग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट- २०२२ परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. २४) रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. आयबीपीएस या संस्थेकडून २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने दाेनशे गुणांची परीक्षा घेण्यात आली हाेती. परीक्षा दिलेल्या २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अपलाेड करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू हाेते. परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
डीटीएड पदविकेसह टीईटी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास टेट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिटनुसार रिक्त जागांवर पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये शिक्षकपदी नियुक्ती देण्यात येते. त्यामुळे राज्य सरकार किती रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबविणार याकडे परीक्षार्थी उमेदवारांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच बीएड पदवी उत्तीर्ण उमेदवारांच्या विषयाच्या रिक्त जागांनुसार नियुक्ती करण्यात येते. त्यामुळे टेट परीक्षेत कितीही गुण पडले तरी जाेपर्यंत विषयानुसार रिक्त जागा किती आहेत, हे स्पष्ट हाेत नाही ताेवर नाेकरी मिळेल का नाही? यात स्पष्टता येणार नाही. दरम्यान, रात्री अनेकदा प्रयत्नही करूनही संकेतस्थळ उघडत नव्हते. तांत्रिक अडचणीमुळे किती गुण पडले हे पाहण्यासाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागली.
जाहिरात न देता अत्यंत गडबडीत परीक्षेचे आयाेजन करण्यात आले. विद्यार्थ्याने मेहनत घेत चांगले गुण प्राप्त केले आणि विषयाच्या जागा नसतील तर त्याची निवड हाेईल याची खात्री नाही. त्यामुळे टेट परीक्षा घेण्यापूर्वी रिक्त विषयाची जाहिरात प्रसिद्ध केली पाहिजे.
- संदीप कांबळे, राज्य उपाध्यक्ष डीटीएड-बीएड स्टुडंटस असाेसिएशन.