Maharashtra: यंदा सोयाबीनचे उत्पन्न ६ टक्क्यांनी कमी होण्याची भीती, कृषी विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:04 PM2023-09-13T12:04:23+5:302023-09-13T12:05:03+5:30

भाताच्या उत्पादकतेतही १३ टक्क्यांची घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे...

Maharashtra: Soybean yield likely to drop by 6 percent this year, Agriculture Department estimates | Maharashtra: यंदा सोयाबीनचे उत्पन्न ६ टक्क्यांनी कमी होण्याची भीती, कृषी विभागाचा अंदाज

Maharashtra: यंदा सोयाबीनचे उत्पन्न ६ टक्क्यांनी कमी होण्याची भीती, कृषी विभागाचा अंदाज

googlenewsNext

पुणे : राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने ऐन फुलोऱ्यातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून, सोयाबीनच्या उत्पादनात सरासरीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सोयाबीनची राज्यात सर्वांत जास्त क्षेत्रावर लागवड झाली असून, भात पिकालाही पावसाच्या खंडाचा फटाका बसला आहे. भाताच्या उत्पादकतेतही १३ टक्क्यांची घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते सोयाबीनच्या उत्पादनात ही घट किमान १५ ते २० टक्के व कापूस पिकात किमान ५ ते १० टक्के घट येऊ शकते.

कृषी विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या आढाव्यातून बहुतांश पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात यंदा १ कोटी ४१ लाख १ हजार २७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक ५०.५४ लाख क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे, तर त्यानंतर कापसाखाली ४२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. संबंध ऑगस्ट कोरडा गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याच काळात सोयाबीन पीक ऐन फुलोऱ्याच्या अवस्थेत होते. मात्र, पाऊस नसल्याने फुलोरा गळून पडला. त्याचा मोठा परिणाम उत्पादकतेवर होणार आहे. गेल्या पाच वर्षांचे सोयाबीनचे सरासरी उत्पादन ४८.८० लाख टन होते, तर यंदा ५० लाख हेक्टरमधून ४५.७३ लाख टन उत्पादन येऊ शकते. ही घट ६ टक्क्यांची आहे. कापूस पिकात मात्र, घट होणार नसल्याचे या अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

बाजरी, ज्वारीत मोठी घट

कृषी विभागाने केलेल्या अंदाजानुसार सर्वाधिक ६७ टक्के घट खरीप ज्वारी, तर ६६ टक्के घट बाजरी पिकात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मक्याच्या उत्पादनात ४१ टक्के घटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुगाचे उत्पादन ६६ टक्क्यांनी, तर उडीद पिकाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे. मात्र, भात पिकात १३ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

सोयाबीन शेंगांच्या अवस्थेत पाऊस नसल्याने मराठवाडा व खान्देशात किमान २० ते २५ टक्के घट होऊ शकते, तर विदर्भात १५ ते २० टक्के घट होईल. कापूस पिकात मात्र, ५ ते १० टक्क्यांची घट होईल. पूर्वेमोसमी लागवड चांगल्या अवस्थेत आहे, तर उशिराच्या पेरणीवर वाढ खुंटली असून, कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ५ ते १० टक्के घट होईल. कापूस उत्पादक विदर्भ, मराठवाडा व खान्देशात हीच स्थिती आहे. तसेच तूर पिकाच्या उत्पादनातही १० ते १५ टक्के घट होईल.

- संजय गाढे, कृषितज्ज्ञ

Web Title: Maharashtra: Soybean yield likely to drop by 6 percent this year, Agriculture Department estimates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.