Maharashtra: रब्बीच्या पेरण्या ९१ टक्क्यांवर, हरभरा वाढला, ज्वारी घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 10:34 AM2024-01-04T10:34:07+5:302024-01-04T10:34:16+5:30

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही घट असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे....

Maharashtra: Rabi sowing at 91 per cent, gram increased, sorghum declined | Maharashtra: रब्बीच्या पेरण्या ९१ टक्क्यांवर, हरभरा वाढला, ज्वारी घटली

Maharashtra: रब्बीच्या पेरण्या ९१ टक्क्यांवर, हरभरा वाढला, ज्वारी घटली

पुणे : राज्यात यंदा रब्बी हंगामात सरासरीच्या ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे हरभऱ्याची लागवड सरासरीपेक्षा जास्त झाली आहे. तर ज्वारीची पेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झाली असली तरी सरासरीच्या तुलनेत घटली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही घट असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्यातील रब्बीचे क्षेत्र सरासरी ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर आहे. यंदा ४९ लाख ८ हजार २३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही पेरणी ९०.९६ टक्के आहे. गेल्या वर्षी ५४ लाख ६४ हजार ७१६ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही पेरणी ९० टक्के आहे.

यंदा हरभऱ्याच्या लागवडीत वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. नोव्हेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू व हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. राज्यात हरभऱ्याचे सरासरी लागवड क्षेत्र २१ लाख ५२ हजार १४ हेक्टर इतके आहे. रब्बी पिकांमध्ये हे क्षेत्र सर्वाधिक आहे. अवकाळी पावसाचा फायदा हरभऱ्याच्या लागवडीला झाला असून यंदा २३ लाख २० हजार ८६० हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही लागवड १०८ टक्के आहे.

हरभऱ्यानंतर ज्वारीचे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. यंदा १३ लाख ७० हजार ८३० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या (१७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर) ही पेरणी ७८ टक्के तर गेल्या वर्षीच्या तुलनेत १०९ टक्के आहे. गव्हाची पेरणी ७ लाख ९५ हजार ५४६ हेक्टरवर झाली आहे. सरासरीच्या (१० लाख ४८ हजार ८०७ हेक्टर) तुलनेत ही पेरणी ७५ टक्के व गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्के आहे.राज्यात यंदा अपुरा पाऊस झाला आहे. विहिरी, कूपनलिकांना पुरेसे पाणी नाही. धरणांमध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पुरेसे आवर्तन मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या सरासरीच्या तुलनेत ९१ टक्केच झाल्या आहेत. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा सुमारे ७० हजार हेक्टर जादा क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या.

पिके क्षेत्र टक्के (सरासरीच्या तुलनेत) गेल्या वर्षीच्या तुलनेत

ज्वारी १३७०८०--७८.१९--१०९

गहू ७९५५४६--७५.८५--८०

मका २६१९५९--१०१.४१--८१

हरभरा २३२०८६०--१०७.८५--८६

एकूण ४९०८२३८--९०.९४--९०

अवकाळी पावसामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ झाली आहे. मात्र, एकूणच परतीच्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने सरासरीच्या तुलनेत पेरण्या काहीशा कमी झाल्या आहेत.

- दिलीप झेंडे, संचालक, विस्तार आणि प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे

Web Title: Maharashtra: Rabi sowing at 91 per cent, gram increased, sorghum declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.