बारामती : बारामतीत महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक २०२४ च्या विरोधात युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी खिशाला काळया फिती लावत जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ चा निषेध नोंदवला. शासनाने हे विधेयक तातडीने रद्द करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी युगेंद्र पवार म्हणाले, 'महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४' हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकूमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे. सरकार या कायद्याचा उपयोग विरोधक, डाव्या संघटना आणि डाव्या संघटनांशी संबंधीत लोकांना, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही आणि बळाचा वापर करून त्यांचेवर कारवाई करण्यात येईल. अशी भीती विविध संघटना आणि विरोधकांनी व्यक्त केली आहे. नक्षलवाद्यांच्या बहाणा करुन आणलेल्या या विधेयका विरोधात कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांचेमध्ये प्रचंड तीव्र असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी हे विधेयक तातडीने रद्द करण्याबाबत आंदोलन केले आहे. १३ हजार नागरीकांनी या विधेयकाविरोधात हरकती नोंदविल्या आहेत. हा सरकार सत्ता सुरक्षा कायदा आहे. या बाबत २ आॅक्टोबरला संपुर्ण राज्यात आंदोलन करणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले.