Maharashtra Election 2019 : शेती महामंडळाचे कामगार टाकणार मतदानावर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:44 IST2019-10-11T13:43:36+5:302019-10-11T13:44:11+5:30
घरांच्या दुरवस्थेमुळे घेतला निर्णय...

Maharashtra Election 2019 : शेती महामंडळाचे कामगार टाकणार मतदानावर बहिष्कार
बारामती : लालपुरी, ५७ चाळ येथे शेती महामंडळाचे कामगार गेल्या ४ पिढ्यांपासून वास्तव्य करीत आहेत. सध्या या घरांची दुरवस्था झाली आहे़. घराच्या भिंती खचल्या, पत्रे कुजले आहेत. परंतु, स्वत:च्या जागा नसल्यामुळे कामगार पुरते हतबल झाले आहेत़. अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये हे कामगार वास्तव्य करत असून मंजूर झालेले घरकुलेही कोठे आहे, हे देखील न उलगडलेले कोडे बनले आहे़.‘आम्हाला जागेसहित घर देण्यात यावे; अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची’ भूमिका कामागरांनी घेतल्याचे समजते़.
१९६३ मध्ये महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांत शेती महामंडळाची स्थापना करण्यात आली. या शेतीवर दलित मागासलेले हजारो कामगार गेल्या ४ पिढ्यांपासून राबराब राबले आहेत. भाडेतत्त्वावर या कामगारांना घरे शेती महामंडळाने दिली आहेत. लालपुरी, धवलपुरी, रत्नपुरी, ५७ चाळ या भागातील शेकडो घरांची पडझड झाली आहे. काही वर्षांपूर्वी या भागातील खासदार नुकसानग्रस्त कामगारांना भेटी देऊन मंत्रालयासमोर उपोषण करून न्याय देण्याचे आश्वासन रत्नपुरी मुख्य कार्यालयासमोर कामगारांना दिले होते. त्यानंतर शासनाने घरकुले दिली़ मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही़.
सध्या निवडणूकीचे वातावरण असून कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मते मागावयास गेले असता तेथील कामगार आम्हाला आमची घरकुले द्या, अशी मागणी करत आहे़.
दोन गुंठे जागा व राहते घर करून देत नाहीत. तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाºयांना मतदान करणार नसल्याचे येथील घरकुल मंजूर होऊन न मिळालेले कामगार राही मसा बाबर, वसंत नामदेव भोसले, दशरथ विठोबा चव्हाण, शंकर दशरथ चव्हाण, भगवान ज्ञानदेव चव्हाण, आभिमान शिंदे, सुखदेव पांडुरंग चव्हाण यांनी केला आहे़.
.......