Maharashtra: उत्तरेकडील बर्फवारीमुळे राज्यातील थंडी वाढण्याची शक्यता!
By श्रीकिशन काळे | Updated: January 30, 2024 17:21 IST2024-01-30T17:20:33+5:302024-01-30T17:21:29+5:30
उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो....

Maharashtra: उत्तरेकडील बर्फवारीमुळे राज्यातील थंडी वाढण्याची शक्यता!
पुणे : उत्तरेकडे सुरू असलेल्या पाऊस आणि बर्फबारीमुळे थंडी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून, सध्या तेथे पडत असणाऱ्या धुके व बर्फबारीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार दि. ४ फेब्रुवारी पर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच १ फेब्रुवारी पर्यंत जाणवणार आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री से. ग्रेड म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने, तर पुणे सातारा कोल्हापूर सांगली व छ. सं. नगर येथे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक तर दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असू शकते, असा अंदाज आहे. विदर्भात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १२ डिग्री से.ग्रेड (म्हणजे सरासरी इतके) तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असू शकते, असे वाटते.
उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीसारखी थंडी पहिल्या आठवड्यात जाणवेल. नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दीड डिग्रीने अधिक राहून म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल, असेही खुळे यांनी सांगितले.
पुण्यात थंडी कायम !
सध्या पुणे शहरामध्ये १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. शिवाजीनगरला १३.६ अंश सेल्सिअस तापमान असून, वडगावशेरीला मात्र १९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरात हा गारठा आणखी दिवस असा राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.