पुणे/वेल्हे: पुण्यातील राजगड तालुक्यातील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ असलेल्या मढेघाट परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर आग्या मोहोळाच्या मधमाशांनी भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात १४ ते १७ वयोगटातील ३५ हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
पुण्यातील एका साहसी ट्रेकिंग क्लासच्या माध्यमातून ५० हून अधिक विद्यार्थी आणि प्रशिक्षक मढेघाट ते उपंडा असा ट्रेक करत होते. रविवारी संध्याकाळी मढे घाट उतरल्यानंतर मध्यभागी असलेल्या गर्द झाडीत झाडावर असलेले आग्या मोहोळ अचानक उठले. काही कळायच्या आतच मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विद्यार्थी सैरभैर झाले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.
स्थानिकांचे धाडसी बचाव कार्यघटनेचे गांभीर्य ओळखून ट्रेकमधील एका सदस्याने तोरण माची हॉटेलचे मालक अभिजीत भेके यांच्याशी संपर्क साधला. ही माहिती सोशल मीडियाद्वारे परिसरात पसरताच केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरीत आणि कड्यामध्ये अडकलेल्या मुलांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले आणि स्वतःच्या वाहनांनी तसेच १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
विद्यार्थ्यांची प्रकृती आणि उपचारहल्ल्यात ८ ते १० विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून २५ विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मधमाशांच्या दंशामुळे विद्यार्थ्यांना खालील त्रास जाणवत होता:
मळमळणे आणि उलट्या होणे.
चेहरा, डोळे आणि ओठांवर प्रचंड सूज.
तीव्र वेदना आणि चक्कर येणे.
वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास आणि त्यांच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले. यातील दोन गंभीर विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या इतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली आहे.
ट्रेकर्ससाठी महत्त्वाची सूचनासह्याद्रीच्या रांगांमध्ये सध्या थंडीचे दिवस असल्याने आग्या मोहोळाच्या माशा सक्रिय असतात. ट्रेकिंगला जाताना गडद रंगाचे कपडे टाळणे, मोठ्याने ओरडणे किंवा धूर करणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
Web Summary : A bee attack injured over 35 students trekking near Pune's Madhe Ghat. Locals rescued the stranded group, averting a major tragedy. Injured students were admitted to the hospital.
Web Summary : पुणे के मढे घाट के पास ट्रेकिंग कर रहे 35 से अधिक छात्र मधुमक्खियों के हमले में घायल हो गए। स्थानीय लोगों ने फंसे हुए समूह को बचाया, जिससे एक बड़ी त्रासदी टल गई। घायल छात्रों को अस्पताल में भर्ती कराया गया।