व्हिडीओ कॉलवर प्रेम फुलले, प्रियकराने फोटो व्हायरल केले
By भाग्यश्री गिलडा | Updated: April 5, 2024 16:51 IST2024-04-05T16:51:05+5:302024-04-05T16:51:54+5:30
प्रेम व्हिडीओ कॉलिंगवर फुलत असताना तरुणाने व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून ठेवले होते

व्हिडीओ कॉलवर प्रेम फुलले, प्रियकराने फोटो व्हायरल केले
पुणे : इन्स्टाग्रामवर बहरलेल्या प्रेमाची फलश्रुती प्रेयसीचे अश्लील फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात झाली. याप्रकरणी गुरुवारी (दि. ४) शुभम पगारे (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर) या तरुणाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अधिक माहितीनुसार, लोणीकंद परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार हा प्रकार १ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान घडला आहे. फिर्यादी तरुणीची छत्रपती संभाजीनगर येथील युवकासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला फारसा वेळ लागला नाही. रोज बोलणे सुरू झाले. हे प्रेम व्हिडीओ कॉलिंगवर फुलत असताना शुभमने व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केले. फिर्यादी तरुणीने वारंवार नकार दिल्याने चिडलेल्या शुभमने तिचे त्या कॉलिंगच्या व्हिडीओवरून फोटो काढून व्हायरल केले. त्यांनतर तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शुभम पगारे याच्या विरोधात लोणीकंद पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे करत आहेत.