हरवला चिमण्यांचा निवारा
By Admin | Updated: March 19, 2015 22:54 IST2015-03-19T22:54:57+5:302015-03-19T22:54:57+5:30
काका प्लीज आमच्या साठी थोडेसे पाणी घराच्या बाहेर ठेवा ना! आणि बरोबर असलेला चिमणीचा फोटो असा संदेश मार्च महिना सुरू झाल्यापासून व्हाट्स अॅपच्या माध्यमातून फिरतो आहे.

हरवला चिमण्यांचा निवारा
बारामती : काका प्लीज आमच्या साठी थोडेसे पाणी घराच्या बाहेर ठेवा ना! आणि बरोबर असलेला चिमणीचा फोटो असा संदेश मार्च महिना सुरू झाल्यापासून व्हाट्स अॅपच्या माध्यमातून फिरतो आहे. या संदेशाची शुक्रवारी (दि.२० ) असलेल्या चिमणी दिनाच्या निमित्ताने पुन्हा आठवण झाली आहे.
अगदी दशकभरापूर्वी चिमणी हा पक्षी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भागच होता. मात्र आता वाढते शहरीकरण, प्रदूषण, सिमेंट-क्राँक्रिटीकरणामध्ये या चिमण्या तग धरू शकत नाही. त्यांचे प्रमाण शहरी भागात बरेच कमी झाले आहे. यामुळेच ‘ गेल्या चिमण्या कुणीकडे ’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे़
चिमण्यांच्या गरजा तशा फारच कमी असतात. त्यांना हवी असते फक्त घरटं करण्याइतपत एक छोटीशी जागा़ कधी मग ती फोटोच्या पाठीमागे, भिंतीच्या फटीत, दरवाजाच्यावर किंवा जिथे जागा मिळेल तिथे ही चिमणी राहते. कधी विहिरीमधील छिद्रांमध्येही ती तिचा आसरा शोधते. मात्र आता शहरीकरणाच्या गराड्यात या चिमण्यांना उपलब्ध असलेली माळवदाची घरे किंवा रामकाटी बाभळींचे प्रमाण कमी झाले आहे. चिमण्या सर्वांत जास्त संख्येने राहात असलेल्या रामकाटी बाभळींची कत्तल करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
आजच्या घरबांधणी पद्धतीत बिचाऱ्या चिमणीला जागाच नाही. अंगण नाही, अंगणात दाणा नाही, बाग आहे; पण अळ्या वा कीड नाही. असलीच तर ती कीटकनाशकांच्या प्रादुभार्वाने दूषित.
हवेतही वाहनांच्या धुराचे प्रदूषण! मग चिमणी राहणार कुठे? शहरात राहीलच कशासाठी? हेही चिमण्यांची संख्या कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहेच. चिमण्यांचा नैसर्गिक अधिवासच नष्ट होत चालल्याने चिमण्या स्थलांतरित होत चालल्या आहेत.
आता उन्हाळा सुरू झाला आहे. या बरोबरच सर्वांनी फार काही नाही पण एक वाटी पाणी पिण्यासाठी ठेवू शकतो. या एक वाटी पाण्याने जर आपण चिमण्यांची तहान भागवू शकला तर खऱ्या अर्थाने चिमणी दिन साजरा करण्यात येईल, असे मत बारामतीतील निसर्गप्रेमी फै य्याज शेख यांनी व्यक्त केले.
मागील २० ते ३० वर्षांत चिमण्यांच्या संख्येत ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट दिसून येत आहे. चिमणी नेहमी सुरक्षित आसरा शोधत असते. तिचा नैसर्गिक अधिवास असलेल्या काटेरी झाडांची संख्या कमी होत चालल्याने चिमण्यांचा निवारा हरवतोय. या वाढत्या शहरीकरणामध्ये चिमण्यांना राहायलाच जागा नसल्याने त्यांची संख्या घटत चालली असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याला त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे महत्त्वाचे आहे़
- डॉ. महेश गायकवाड,
निसर्गतज्ज्ञ