आढळराव यांच्या पक्षबदलाने शिवसेनेची हानी; नीलम गोऱ्हेंनी मांडली भावना
By निलेश राऊत | Updated: April 5, 2024 20:39 IST2024-04-05T20:38:34+5:302024-04-05T20:39:09+5:30
लोकसभा जागा वाटपमध्ये महायुतीत प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील असे नसते असं त्यांनी म्हटलं.

आढळराव यांच्या पक्षबदलाने शिवसेनेची हानी; नीलम गोऱ्हेंनी मांडली भावना
पुणे - एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्या पक्षाची हानी ही होतच असते. शिवाजीराव आढळराव हे शिवसेना सोडून गेले त्यामुळे शिवसेनेची हानी होईल. असे प्रतिपादन करून, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढळराव हे ताटातून वाटीत गेले असल्याची टिप्पणी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोकसभा जागा वाटपमध्ये महायुतीत प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील असे नसते. युतीमध्ये यापूर्वी ही तडजोडी झाल्या आहेत. महायुतीच्या पक्ष प्रमुखांकडून याबाबत अंतिम निर्णय घेतील. सध्या आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत. भाजपने आमचे उमेदवार बदलले असे पर्सेप्शन तयार केले आहे, पण अशा प्रकारे गैरसमज पसरवणे योग्य नाही. यापूर्वीही पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिली गेली आहे. होती. महायुती ही एकत्र काम करण्यासाठी केलेले समीकरण असते. त्याला अंतिम स्वरुप येण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे आधीपासून असे आडाखे बांधणे योग्य नाही. आमच्याकडे अजून कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे आरोप केले नाहीत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पुण्यातील लढत दुहेरीच
वंचित कडून वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणुकीत उतरल्याने पुण्यातील लढत तिरंगी होणार असे बोलले जात आहे. यावर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी, गेल्या काही निवडणुकीतील अनुभव पाहता वंचितचा पहिल्या पहिल्यांदा जोर असतो. पण मतदानावेळी तो कमी होतो. त्यामुळे पुण्याची निवडणुक ही मोहोळ व धंगेकर अशी दुहेरीच होईल असे सांगितले. दरम्यान अजित पवार यांचे पूर्ण जिल्ह्यातील काम पाहता बारामती मध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी बारामती लोकसभा मतदार संघात मेळावे घेतले आहेत, जिथं जिथं माझी गरज असेल, तिथं तिथं मी प्रचाराला जाईल असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती असले तरी ते लोकशाहीचे छत्रपती आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे आपल्याला आणि छत्रपती यांना मतदानाच्या एकच अधिकार आहे. तिकीट न मिळाल्याने उदयन राजे यांचा सन्मान कमी होईल असे समजण्याचे कारण नसल्याचे ही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.