अंधाराला भिडल्या रातरागिणी! वर्षातील सर्वात मोठ्या रात्रीवर हजारो महिलांची मात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:42 PM2023-12-22T23:42:38+5:302023-12-22T23:43:12+5:30

‘लोकमत’च्या वतीने आयोजित करण्यात आला ‘सखी रातरागिणी’ नाईट वॉक

Lokmat Sakhi Raatragini Night walk in Pune to overcome evil of the darkness on longest night of the year | अंधाराला भिडल्या रातरागिणी! वर्षातील सर्वात मोठ्या रात्रीवर हजारो महिलांची मात

अंधाराला भिडल्या रातरागिणी! वर्षातील सर्वात मोठ्या रात्रीवर हजारो महिलांची मात

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: आज शुक्रवारी २२ डिसेंबर सर्वात मोठी रात्र...या रात्रीवर मात करण्यासाठी हजारो महिला मुठा नदीकाठी एकत्र आल्या...अंधारावर करू मात असा निर्धार करून त्या टिळक चौक (अलका चौक) ते शनिवारवाड्या दरम्यान अंधारावर चालून गेल्या. घरात नेहमी सातच्या आत यावे ही समाजाने घालून दिलेली चौकट ताेडून त्या रस्त्यावर उतरल्या आणि सर्वात मोठ्या रात्रीच्या अंधारावर स्वार झाल्या. प्रत्येकाच्या मनातील भीतीचा अंधार दूर झाला आणि त्यांनी मनसोक्तपणे ऐतिहासिक वॉकचा आनंद लुटला. ‘हरला रे हरला अंधार हरला’ अशी घोषणा देत त्या निर्भय झाल्या. निमित्त होते ‘लोकमत’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘सखी रातरागिणी’ या नाईट वॉकचे...

२२ डिसेंबर या दिवसाची रात्र ही सर्वात मोठी आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधाराची भीती सर्व महिलांच्या मनात असते. तीच भीती दूर व्हावी म्हणून या नाईट वॉकचे आयोजन करण्यात आले हाेते. रात्री १० वाजता अलका चौकात (टिळक चौक) हजारो महिला एकत्र आल्या आणि तिथे मशाली पेटवून त्यांनी नदीपात्रातून चालत शनिवारवाडा गाठला. या दरम्यान ठिकठिकाणी त्यांनी गप्पा, गाणी अन‌् चहाचा आस्वाद घेतला.

‘अंधारावर चालून गेल्या रातरागिणी रातरागिणी’,‘असू दे अंधार आम्ही घाबरत नाय’,‘आम्ही अंधारावर चालून जाणार’,‘देवी नका मानू आम्ही माणूस हाय,’‘होऊ दे कितीही अंधार, हाती मशाल घेऊन मागे नाही फिरणार’,‘घाबरत नाय घाबरत नाय अंधाराला घाबरत नाय’ अशा घोषणा देत महिलांनी अलका चौक (टिळक चौक) ते शनिवारवाडा या दरम्यान ऐतिहासिक नाइट वॉक केला.

वस्त्रहरण आता होणार नाही, अपहरणाचा मुद्दाच नाही, रस्त्यावर उतरल्या वाघिणी आणि भिडल्या रात्रीच्या अंधाराला. मनातील अंधारावर मात करण्यासाठी हिररीने महिला रात्री ९ वाजल्यापासूनच अलका चौकात येत होत्या. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. आम्ही जिंकू, अंधाराला हरवू, अशा आवेगात त्या बिनधास्तपणे अलका चौकाकडे येत आल्या. प्रत्येकीने हाती मशाल घेऊन एका नव्या चळवळीला सुरवात केली.

सुरवातीला सचिन काटे यांच्या संबळ वादनाने वातावरणात उत्साह आणला. लहान बाळाला घेऊन महिला या रातरागिणी नाइट वाॅकसाठी येत होत्या. प्रत्येक महिलेच्या चेहर्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता. 'आम्ही जिजाऊच्या मुली' या गाण्याने उपस्थित महिलांमध्ये एक जोश भरला. गाण्यावर टाळ्यांचा ठेका धरत होत्या. यावेळी माजी आमदार, माजी नगरसेविका, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, दिव्यांग, विद्यार्थिनी, तरूणी, तृतीयपंथी आदी महिला अतिशय आत्मविश्वासाने रातरागिणी नाइट वाॅक मध्ये सहभाग झाल्या. 'बादल पे पांव है, छोटा गाव है, अब भाई चल पडी अपनी नाव है' या गाण्यावर सर्व महिला थिरकल्या.

रस्त्यावर आज उतरल्या रातरागिणी

अंधारावर चालून गेल्या रातरागिणी, रातरागिणी, अंधाराची...आता भीती, घाबरत नाही, घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, 'हादरणार रे हादरणार, शनिवारवाडा हादरणार' अशा घोषणांनी टिळक चौक दणाणून गेला. एकीने एक एक निर्भीड सार्रा बना गं असा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. ढोल ताशाच्या तालावर आजीबाई देखील ठेका धरून नाचत होत्या.

संपादक संजय आवटे म्हणाले, पुण्यातील हा पहिला इव्हेंट हा मुव्हमेंट आहे. आज महिला कानाकोपऱ्यातून महिला आल्या आहेत. आज कोणीही सेलिब्रिटी नाही. तुम्ही सर्व सेलिब्रिटी आहात. टिळक चौकातून आपण वाॅक सुरू करत आहोत. तुमच्यासोबत पुण्याच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील आल्या आहेत. त्या सर्वांसोबत आहेत. आज महिलांची मोठी ताकत येथे आहे. ही महिला कोणाला घाबरत नाहीत. 

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, लोकमतचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. महिला अखंड उर्जेचा स्त्रोत आहे. कोणीही घाबरायचे नाही. पुणे पोलीस नेहमीच तुमच्या सोबत आहे. इंदापूर येथे एका मुलीच्या अर्भकाला टाकून दिले होते. ज्या टीमने या मुलीला वाचवले त्या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Lokmat Sakhi Raatragini Night walk in Pune to overcome evil of the darkness on longest night of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.