Lokmat Impact : पीएम सूर्यघर योजना तगणार; वीज नियामक आयोगाचा घरगुती ग्राहकांना दिलासा
By नितीन चौधरी | Updated: March 30, 2025 18:21 IST2025-03-30T18:19:41+5:302025-03-30T18:21:12+5:30
- ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, महावितरणला यानिमित्ताने जोरदार दणका दिला

Lokmat Impact : पीएम सूर्यघर योजना तगणार; वीज नियामक आयोगाचा घरगुती ग्राहकांना दिलासा
पुणे : केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेला घरघर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महावितरणला राज्य वीज नियामक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. केवळ सकाळी सौर वीज वापरल्यासच अतिरिक्त तयार झालेली वीज परतावा गृहीत धरला जाईल, हा महावितरणचा प्रस्ताव आयोगाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे सौर वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ग्राहकांना टीओडी मीटर पद्धत लागू राहणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. ‘लोकमतने या विषयाचा पाठपुरावा केला होता.
पंतप्रधान सूर्यघर योजनेत सौर यंत्रणा बसवलेल्या ग्राहकांच्या घरात दिवसभर तयार झालेली वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये द्यावी लागते. ग्राहकाने दिवसरात्र वापरलेली वीज सौर यंत्रणेतून तयार केलेल्या युनिटमधून वजा करून उर्वरित युनिटचे पैसे भरावे लागतात. तयार केलेली वीज वापरलेल्या विजेपेक्षा जास्त असल्यास तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतात. आर्थिक वर्ष संपेपर्यंत या शिल्लक युनिटचा वापर ग्राहक करू शकतो. वर्षअखेर अतिरिक्त युनिटच्या बदल्यात महावितरण ग्राहकाला पैसे देते. ही यंत्रणा सुरळीत राबविण्यासाठी नेटमीटर बसविण्यात येतात. आजवर घरगुती ग्राहकांना देण्यात आलेले हे नेटमीटर स्मार्ट मीटर नव्हते. महावितरणकडून या सर्व ग्राहकांना स्मार्ट नेटमीटर अर्थात टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर बसविण्यात येणार आहेत. हीच मेख महावितरणने मारली होती. परिणामी ग्राहकांना मोठा फटका बसणार होता.
महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिलेल्या प्रस्तावात रुफटाॅप रेग्युलेशन्स २०१९ नुसार टीओडी मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसा अर्थात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या काळात सौर यंत्रणेतून तयार झालेल्या विजेतून वापरलेली वीज वजा करून उर्वरित वीज ही कमी मागणी असलेल्या काळात (ऑफ पीक) तयार झालेली वीज म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही असे नमूद केले होते. त्यामुळे योजनेच्या आधीच्या नियमानुसार त्या युनिटची भरपाई (दिवसभरात एकूण वापरलेल्या युनिटमधून वजाबाकी) होणार नाही. मुळातच सौर यंत्रणेमधून वीज दिवसाच तयार होते. तर घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत असतो. त्यामुळे त्याला आता या टीओडी मीटरमुळे भरपाई मिळणार नव्हती. आपल्या व्यवसाय धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच महावितरणकडून टीओडी मीटरच्या माध्यमातून या योजनेच्या मुळावर घाला घालण्याचे काम होणार होते.
याबाबत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मोहीम राबवत महावितरणचा हा डाव हाणून पाडण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज दरवाढ प्रस्तावावर आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सुनावणींमध्ये हरकती नोंदविल्या. ‘लोकमत’नेही या वृत्ताला सविस्तर प्रसिद्धी देत हा प्रश्न लावून धरला होता. घरगुती ग्राहकाला स्मार्ट मीटर किंवा स्मार्ट नेटमीटर लावले तरी टीओडी मीटरप्रमाणे बिल लावू नये व सध्याचीच पद्धत चालू ठेवावी, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वीज नियामक आयोगाने शुक्रवारी (दि. २८) घोषित केलेल्या पंचवार्षिक वीज दरवाढ प्रस्तावात घरगुती सोलर ग्राहकांना टीओडी पद्धत लागू होणार नाही व त्यांच्यासाठी आजवरची पद्धतच लागू राहील, अशी स्पष्ट तरतूद केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, महावितरणला यानिमित्ताने जोरदार दणका दिला आहे.
वीज नियामक आयोगाने महावितरणचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे ही योजना आता तग धरू शकेल. अन्यथा केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला नख लागले असते. या निर्णयाबाबत आयोगाचे मनापासून आभार - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे