Lokmat Impact: पुणे महापालिकेच्या दारात रात्रीतुन उभारण्यात आलेल्या हाेर्डिंगवर कारवाई
By राजू हिंगे | Updated: May 17, 2024 14:35 IST2024-05-17T14:35:22+5:302024-05-17T14:35:48+5:30
नियमात नसतानाही होर्डिंग उभारण्यास महापालिका अधिकारी परवानगी देत असल्याने होर्डिंगच्या परवानगी प्रक्रियेवरच उभे राहिले प्रश्नचिन्ह

Lokmat Impact: पुणे महापालिकेच्या दारात रात्रीतुन उभारण्यात आलेल्या हाेर्डिंगवर कारवाई
पुणे : पुणे महापालिकेच्या दारातच भर रस्त्यावर सर्व नियम धाब्यावर बसवुन माेठे हाेर्डिंग उभारण्यात आले. एका रात्रीतुन हे हाेर्डिंग उभारण्याची कारनामा करण्यात आला. या बाबतचे वृत दैनिक लोकमतने दिल्यानंतर पालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. त्यानंतर या हाेर्डिंगवर पालिकेने कारवाई करून ते काढुन टाकण्याचे काम सुरू केले आहे.
मुंबईतील घाटकाेपरची घटना ताजी असतानाही ऐन वर्दळीच्या ठिकाणी ‘पीएमपी’कडून हाेर्डिंग उभारले जात आहे. पुणे महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने या हाेर्डिंगला आणि झाडाच्या फांद्या कापण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, झाडाच्या फांद्या तोडून होर्डिंगची उभारणी करू नये, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले हाेते. त्यानंतरही चक्क महापालिकेच्याच दारात आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करून हाेर्डिंग उभारले गेले. अनधिकृत, धोकादायक होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर असताना पालिका मुख्य इमारतीसमोरच होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी देत आहे. अगोदरच पीएमपीच्या बसमुळे कायम महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर वाहनांची गर्दी असते. अशात भर रस्त्यावर पीएमपीला होर्डिंग उभारण्याची परवानगी दिली आहे. नियमात नसतानाही अशा प्रकारे होर्डिंग उभारण्यास महापालिका अधिकारी परवानगी देत असल्याने होर्डिंगच्या परवानगी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रस्त्यावर उभारण्यात येणारे होर्डिंग महापालिका काढणार का? असा सवाल उपस्थित केला होता. या बाबत लोकमतने वृत दिले होते. त्यानंतर पालिकेच्या प्रशासकीय वतुळात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर पालिका प्रशासनाने या होर्डिंगवर कारवाई केली.
महापालिका पीएमपी बसथांब्यावर दररोज हजारो प्रवासी येतात. ज्या ठिकाणी होर्डिंग उभे केले जात आहे तेथेच रांगेत अनेक जण बसची वाट पाहत उभे असतात. तरीही नागरिकांच्या सुरक्षेचा विचार न करता महापालिकेने थेट परवानगी दिली आहे. त्यामुळे या होर्डिंगला परवानगी देणा०या अधिका०यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.