पिंपरी : शेतकरी विधायकविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला चीन, पाकिस्तानमधून रसद मिळते की काय अस वाटत आहे, आंदोलनात भाड्याने कार्यकते आणले जात आहेत, असे वादग्रस्त विधान पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे केले आहे.
महापालिका सर्वसाधारण सभेत शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटले. सभेत उपमहापौर केशव घोळवे यांनी आंदोलनाची चेष्टा केली. मुक्ताफळे उधळली. आंदोलनाचा सबंध चीन पाकिस्थानशी जोडताना घोळवे यांनी आंदोलनाला रोजंदारीने लोक येत आहेत, अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानावर महापालिकेतील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. तर, भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली.
आंदोलनाचा सबंध पाकिस्तान शी जोडणं हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल आशा पद्धतीने वक्तव्य करणे म्हणजे शेतकरी आंदोलनाची थट्टा करणे होय. हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. उपमहापौर घोळवे यांनी देशातील प्रत्येक शेतकऱ्याचा अपमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. - राजू मिसाळ, विरोधी पक्षनेते
उपमहापौर केशव घोळवे यांनी शेतकरी आंदोलनावर केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. चीन, पाकिस्तानच्या नावावर कोण पोळी भाजताय, हे अख्खा देश पाहतोय. घोळवेंनी माफी मागायला हवी होती. आम्ही निषेध नोंदविला, सभा तहकूब करण्याची मागणी केली. मात्र, विरोध जुमानून भाजपने सभा पुढे सुरू ठेवली. -राहुल कलाटे, गटनेता, शिवसेना
महापौर उषा ढोरे यांनी जोडले हात
उपमहापौराच्या वक्तव्य यावर महापौर उषा ढोरे यांनी हात जोडले तर पक्षनेते नामदेव ढाके यांनी मला काही ऐकायला आले नाही. कानावर हात ठेवले.