Local Body Election : जिल्ह्यात थंडी ओसरताच मतदानात उसळी; दुपारी ५१.६ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:29 IST2025-12-02T19:28:49+5:302025-12-02T19:29:50+5:30
- शिरूर-इंदापूरमध्ये मतदान यंत्रातील बिघाडामुळे गोंधळ, भोरमध्ये आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांशी पंगा

Local Body Election : जिल्ह्यात थंडी ओसरताच मतदानात उसळी; दुपारी ५१.६ टक्के मतदान
पुणे : जिल्ह्यातील १२ नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २) उत्साहात मतदान पार पडले. थंडीमुळे सकाळी केंद्राबाहेर मतदारांचा ओघ कमी होता. मात्र, ११ वाजल्यानंतर लोक घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली. मतदान केंद्राबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेतीनपर्यंत ५१.६ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, भोरमध्ये आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते आाणि पोलिस प्रशासनामध्ये वादावादीचा प्रकार घडला, तर शिरूर आणि इंदापूरमध्ये एका वॉर्डातील मतदान केंद्रातील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने काही काळ गदारोळ झाला.
जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. हवेत गारठा जाणवत असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सकाळी घराबाहेर पडणे नापसंत केले. त्यामुळे सकाळी ९:३० पर्यंत जिल्ह्यात केवळ ८.३७ टक्के इतकेच मतदान झाले होते. त्यानंतर मात्र हळूहळू मतदार बाहेर पडू लागले. सकाळी ११:३० पर्यंत २०.२२ टक्के इतकी मतदानाची नोंद झाली.
इंदापूर येथील सरस्वती नगरमध्ये असणाऱ्या मतदार केंद्रावरील एका मतदान यंत्रात घड्याळाचे चिन्ह दिसत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने तत्काळ त्या ठिकाणी दुसरे मशीन लावले. त्यासाठी काही अवधी गेल्याने मतदान केंद्राबाहेर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. असा काहीसा प्रकार शिरूरमध्येही घडला. दुपारच्या सुमारास शिरूरमधील वॉर्ड क्र. २ मधील मशीन अचानक बंद पडल्याने गदारोळ झाला. उपस्थित मतदारांनी ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली; पण तरीही हे मशीन बदलण्यास एका तासाचा अवधी लागला. यामुळे काही काळ प्रशासनाच्या कामकाजावर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तासानंतर या ठिकाणी नवीन मशीन बसविण्यात आल्यानंतर येथील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.
भोर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी टश्शन पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी धावपळ करताना दिसत होते. शिवाय केंद्राबाहेर लावलेल्या बूथवरही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना हटकवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासन यांच्यामध्ये किरकोळ स्वरूपात वादावादी झाली. उर्वरित ठिकाणी उत्साहात आणि शांततेत मतदान पार पडले.
इंदापूरला उमेदवारांमध्ये बाचाबाची
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्व पक्ष एकत्र आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. त्यामुळे इथल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी मतदानादिवशी वॉर्ड क्र. ६ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अक्षय सूर्यवंशी आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचे कृष्णा ताटे यांच्यात वादावादी झाली. सूर्यवंशी हे केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे आशीर्वाद घेत होते. त्यावर ताटे यांनी आक्षेप घेतल्याने दाेघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवला.
भोरला ईव्हीएम मशीनची पूजा
भोरला मतदान प्रक्रिया सुरू होत असताना प्रभाग क्रमांक नऊमधील संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा येथील केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीने ईव्हीएम मशीनला हळदी-कुंकू वाहून ओवाळून पूजा केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ या केंद्रावरील केंद्राध्यक्ष यांना बदलून त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
२१ डिसेंबरला होणार मतमोजणी
जिल्ह्यातील १२ नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान पार पडले असले तरी त्याची मतामेजणी बुधवारी होणार नाही. बारामती, फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद आणि तळेगाव दाभाडे येथील सहा जागा, दौंड, सासवड येथील प्रत्येकी एक तर लोणावळ्यातील दोन जागांवर २० डिसेंबरला मतदान होईल. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतामोजणी २१ डिसेंबरला होणार आहे.
भोर व भोर १
१. भोर येथील प्रभाग क्रमांक ९ मधील संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीने ईव्हीएम मशीनला हळदीकुंकू वाहून ओवाळून पूजा केली.
चाकण गर्दी
२. चाकण येथील मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी नागरिकांनी केलेली गर्दी.
चाकण गर्दी
३. चाकण येथील मतदान केद्रांवर दिव्यांग आणि वृद्धांसाठी व्हीलचेअर सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.
मंचर तृतीयपंथी
४. मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये तृतीयपंथी एकमेव मतदाराने मतदानाचा अधिकार बजावला आहे. गौरी उर्फ गणेश खंडू खांडेभराड यांनी दुपारी मतदान केले.