'राज्यघटना' ऐका खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आवाजात..! 'आस्क एआय होलोबॉक्स ' द्वारे मिळणार संधी
By नम्रता फडणीस | Updated: March 5, 2025 17:52 IST2025-03-05T17:51:47+5:302025-03-05T17:52:52+5:30
सिंबायोसिस' च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारकात 'आस्क एआय होलोबॉक्स ' द्वारे मिळणार संधी

'राज्यघटना' ऐका खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आवाजात..! 'आस्क एआय होलोबॉक्स ' द्वारे मिळणार संधी
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समोर उभे आहेत. तुम्ही त्यांना राज्यघटनेबद्दल प्रश्न विचारताय आणि ते तुमच्या प्रश्नांना उत्तर देतायत , ही कल्पनाच खूप भारी आहे ना! पण ही कल्पना प्रत्यक्षात अवतरली आहे ती ' आस्क एआय होलोबॉक्स ' च्या माध्यमातून. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने एक महिन्यासाठी हा बॉक्स सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारकाला दिला असून, पुण्यासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, खुद्द डॉ. आंबेडकर यांच्या आवाजात राज्यघटना नागरिकांना ऐकायला मिळणार आहे.
सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर या वेळी उपस्थित होत्या. यावेळी आस्क एआय होलोबॉक्सचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
'राज्यघटना' ऐका खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आवाजात..! 'आस्क एआय होलोबॉक्स ' द्वारे मिळणार संधी pic.twitter.com/aNpr9RlzH6
— Lokmat (@lokmat) March 5, 2025
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने १ ते ३१ मार्च या कालावधीसाठी देशातील केवळ सहा ठिकाणी ‘आस्क एआय होलोबॉक्स’ स्थापन केले आहेत. त्यात ३ दिल्ली, १ नागपूर, १ महू (मध्यप्रदेश) आणि १ पुण्यात सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाचा समावेश आहे. . एआय आणि डिजिटायझेशन यांच्या मिलाफातून हा होलोबॉक्स तयार करण्यात आला आहे.
या माध्यमातून राज्यघटना आणि डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल काही प्रश्न विचारल्यास त्याची उत्तरे स्वत: डॉ. आंबेडकर यांच्या आवाजात मिळणार आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकर हे स्वत: आपल्याशी संवाद साधत आहेत, असा अनुभव घेता येणार आहे. ‘हा होलोबॉक्स राज्यघटना आणि डॉ. आंबेडकरांच्या योगदानाशी संबंधित प्रश्नांना संवाद आणि आवाजाच्या माध्यमातून प्रतिसाद देण्यासाठी डिझाइन केला आहे. दि. ३१ मार्चपर्यंत सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत हा होलोबॉक्स पाहण्यासाठी उपलब्ध असेल’, असे संजीवनी मुजुमदार यांनी सांगितले.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आणखी एक महिना हा होलोबॉक्स सिम्बायोसिसमध्ये ठेवण्याची विनंती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमधून प्रश्न विचारता येणार आहेत. सध्या परीक्षेचा काळ सुरू असल्याने आणि पुढील महिन्यात दि. १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांची जयंती असल्याने आणखी एक महिना हा होलोबॉक्स सिम्बायोसिसमध्ये ठेवावा, अशी विनंती केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे’, असे डॉ. येरवडेकर यांनी सांगितले.