शिधापत्रिकेला आधार जोडणीचे काम पुण्यात वेगाने; गरजू नागरिकांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:33 IST2017-12-27T14:19:28+5:302017-12-27T14:33:32+5:30
शिधापत्रिकेला आधारकार्ड जोडणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील अंत्योदय कार्डधारकांची ६० टक्के आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ८४ टक्के आधार जोडणी झाली आहे.

शिधापत्रिकेला आधार जोडणीचे काम पुण्यात वेगाने; गरजू नागरिकांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न
पुणे : शिधापत्रिकेला आधारकार्ड जोडणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील अंत्योदय कार्डधारकांची ६० टक्के आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ८४ टक्के आधार जोडणी झाली आहे. गरजू नागरिकांनाच स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा आणि या धान्याचा बाळाबाजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने आधार जोडणी करणे बंधनकारक केले आहे.
स्वस्त धान्य ग्राहकांना आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली. भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये पॉर्इंट आॅफ सेल (पॉस) यंत्रे बसविण्यात आली आहेत. केंद्र सरकार प्रतिवर्षी अन्नधान्याच्या अनुदानापोटी १ लाख ४० हजार कोटी रुपये खर्च करते. हे अनुदान योग्य व्यक्तींपर्यंत जाण्यासाठी आधारची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला होता.
जिल्ह्यामध्ये ४० टक्केच अंत्योदय कार्डधारकांची आधार जोडणी झाली आहे, तर शहरातील १२ हजार ५७७ अंत्योदय कार्डधारकांपैकी ७ हजार ५३३ म्हणजेच ६० टक्के लोकांची आधार जोडणी झाली आहे. तर ३ लाख ३८ हजार २२२ अन्नसुरक्षा कार्डधारकांपैकी २ लाख ८४ हजार ३४९ लोकांचे आधार प्रमाणीकरण झाले असून त्याची आकडेवारी ८४ टक्के आहे. आधारकार्ड जोडलेले नसल्यास धान्य वितरित केले जाणार नाही.