परदेशातील हायब्रिड कोर्सकडे विद्यार्थ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:33+5:302020-12-08T04:11:33+5:30
पुणे : कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून भारातून परदेशात येणाऱ्या आणि परदेशातून भारतात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची ...

परदेशातील हायब्रिड कोर्सकडे विद्यार्थ्यांची पाठ
पुणे : कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून भारातून परदेशात येणाऱ्या आणि परदेशातून भारतात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. तसेच अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांनी सुरू केलेल्या हायब्रिड अभ्यासक्रमांकडे सुध्दा भारतीय विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भारतासह जगभरात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे परदेशातील शिक्षणाची दारे बंद झाली. परंतु, काही शैक्षणिक संस्थांनी परदेशातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने प्रवेश दिला. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माध्यमातून संलग्न महाविद्यालयात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यंदा सुमारे ५५० ते ६०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून लवकरच या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होणार आहे.
दिलीप ओक अॅकडमीचे संचालक दिलीप ओक म्हणाले, कोरोनाचा परदेशातील शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिकेतील बहुतांश सर्वच विद्यार्थ्यांनी काही भाग ऑनलाईन व काही ऑफलाईन असा हायब्रिड अभ्यासक्रम तयार केला.मात्र, त्यास भारतातील केवळ १० टक्के विद्यार्थ्यांकडूनच प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल ९० टक्के विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे म्हणाले, कोरोनामुळे पुणे विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत फारसा फरक झाला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.