विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

By Admin | Updated: January 22, 2015 00:41 IST2015-01-22T00:41:24+5:302015-01-22T00:41:24+5:30

जिल्ह्यातील हजारो महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी समाजातील टवाळ मुलांना जशास तसे उत्तर देण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

Lessons for self-defense for women | विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला प्रत्येक संकटाचा सामना करता यावा, निर्भय होऊन समाजात ताठ मानेने जगता यावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘निर्भय कन्या अभियान’, ‘माझी आई माझ्या महाविद्यालयात’, ‘विद्यार्थिनी व्यक्तिमत्त्व विकास’ या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील हजारो महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी समाजातील टवाळ मुलांना जशास तसे उत्तर देण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे आता या विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन रडायचं नाय तर लढायचं, असा निश्चय केला आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतर्फे विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मानसिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जातो. महाविद्यालयाच्या परिसरात फिरणाऱ्या टवाळ मुलांना वेळीच अटकाव कसा करावा, यासंदर्भातही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे अद्याप ज्यांनी या योजनांचा लाभ घेतला नाही, त्यांनी व्यक्तिमत्त्व विकास वाढीबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे घेऊन अन्याय, अत्याचाराचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य अंगीकार करता येऊ शकते. याप्रमाणे ‘माझी आई माझ्या महाविद्यालयात’ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थिनीच्या आईला माझी मुलगी कोणत्या वातावरणात शिक्षण घेते,
आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी महाविद्यालयात कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, मुलीच्या सुरक्षेबाबत किंवा ती लवकर घरी पोहोचली नाही, तर कोणाशी संपर्क साधावा आदी गोष्टींची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे आपली मुलगी महाविद्यालयांच्या विविध योजनांच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे घेते का? याची काळजी प्रत्येक मुलीच्या आईनेसुद्धा घ्यायला हवी.
(प्रतिनिधी)

विद्यार्थिनींना सक्षम करण्याचा प्रयत्न विद्यापीठातर्फे केला जात असून, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ४२९ महाविद्यालयांमध्ये सध्या कमवा व शिका योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थिनीला काम दिले जात आहे. त्याचबरोबर २००हून अधिक महाविद्यालयांनी २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात निर्भया अभियानाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीची प्रकरणे व प्रदूषित सामाजिक पर्यावरणाचा प्रतिकूल परिणाम स्त्री-शिक्षणावर होतो. मुली भयाच्या वातावरणात वाढतात. परिणामी, अभ्यासेतर उपक्रमांमध्ये मुली मोकळेपणाने सहभागी होत नाहीत. त्यामुळे मुलींनीच आपण सबळ आहोत, मानसिकदृष्ट्या स्वावलंबी आहोत, स्वत:चे संरक्षण स्वत:च केले पाहिजे, अशा प्रकारे आपल्या सामर्थ्याची ओळख पटवून घेतली पाहिजे. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या निर्भय कन्या अभियानाचा लाभ अधिकाधिक महाविद्यालयांनी घ्यायला हवा.

आपली मुलगी घरापासून किती अंतरावरील महाविद्यालयात शिक्षण घेते, तिला कोणते शिक्षक मार्गदर्शन करतात, तिचा मित्र परिवार कोणता आहे, आपल्या मुलीच्या स्वभावातील काही महत्त्वाच्या गोष्टी महाविद्यालयातील कोणत्या व्यक्तीला सांगणे आवश्यक आहे, मुलगी लवकर घरी आली नाही, तर कोणाशी संपर्क साधावा अशा विविध गोष्टींची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या आईला घेता यावी, या उद्देशाने ‘माझी आई माझ्या महाविद्यालयात’ ही योजना राबविली जात आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांनी ही योजना राबविली आहे.
- डॉ. पंडित शेळके, माजी विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे जिल्ह्यातील २१२ महाविद्यालयांनी विद्यार्थिनी व्यक्तिमत्त्व विकास योजना राबविली असून, ९७ महाविद्यालयांनी निर्भय कन्या अभियान योजना राबविली आहे. विद्यापीठातर्फे विविध योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, त्यांना भयमुक्त वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी अधिकाधिक महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या सहकार्याने अशा योजना राबविणे गरजेचे आहे.
- डॉ. संजयकुमार दळवी, विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

Web Title: Lessons for self-defense for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.