वाहनतळामध्ये वाहने कमी अन् घाणच अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:34+5:302021-02-05T05:19:34+5:30
पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील स्व. सतीशशेठ मिसाळ वाहनतळामध्ये कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या वाहनतळाची नियमित स्वच्छता होत ...

वाहनतळामध्ये वाहने कमी अन् घाणच अधिक
पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील स्व. सतीशशेठ मिसाळ वाहनतळामध्ये कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या वाहनतळाची नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जागोजाग जळमटे झाली असून पायऱ्या तसेच मजले धुळीने माखले आहेत. वाहनतळाच्या स्वच्छतेकडे पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
नागरिकांच्या सोईसाठी पालिकेने हे वाहनतळ उभारलेले आहे. हे वाहनतळ ठेकेदारी पद्धतीने चालविण्यास दिलेले होते. परंतु, थकबाकी आणि नागरिकांच्या सततच्या तक्रारी यामुळे पालिकेने हे वाहनतळ ठेकेदाराकडून काढून घेतले होते. कोरोनाकाळामध्ये बंद असलेले वाहनतळ पुन्हा सुरु करण्यात आले. तूर्तास या ठिकाणी नि:शुल्क सेवा देण्यात येत आहे. चारचाकी-तीनचाकी आणि दुचाकी गाड्या येथे लावत आहेत. त्यासाठी पालिकेकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे नागरिकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.
परंतु, वाहने लावण्याच्या जागेमध्ये तसेच मोकळ्या जागा, जिन्याखाली कचऱ्याचे ढीग साचले आहेत. काही ठिकाणी मद्याच्या बाटल्या पडल्या आहेत. तर, भिंती आणि जिन्यांमध्ये गुटखा-पान-तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या आहेत.
वाहनतळाची दैनंदिन स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे येथील कचरा वाढत चालला आहे. त्यामुळे वाहनतळावर आलेल्या नागरिकांना या घाणीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे दिवसभर पालिकेने नेमलेले कर्मचारी या ठिकाणी बसून असतात. परंतु, कोणीही त्याची स्वच्छता करून घेत नाही. पालिकेच्या संबंधित विभागाने उदासीनता सोडून वाहनतळाची स्वच्छता करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.