मांजरी–केशवनगर परिसरात बिबट्याची दहशत; शाळेजवळच आढळून आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:21 IST2025-12-20T12:21:02+5:302025-12-20T12:21:19+5:30
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी-संध्याकाळी फिरायला जाणारे रहिवासी यांच्यात चिंता वाढली आहे

मांजरी–केशवनगर परिसरात बिबट्याची दहशत; शाळेजवळच आढळून आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण
हडपसर : मांजरी–केशवनगर परिसरातील दि ऑर्बीस स्कूलजवळ असलेल्या अल्कोन सिल्वरलेफ सोसायटीमध्ये बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही बिबट्याची हालचाल स्पष्टपणे कैद झाली आहे.
घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी-संध्याकाळी फिरायला जाणारे रहिवासी यांच्यात चिंता वाढली आहे. ही घटना शाळेजवळ घडल्याने पालकांमध्येही मोठी भीती निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती वन विभाग व स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्री अनावश्यक बाहेर पडू नये, एकटे चालणे टाळावे, तसेच बिबट्या दिसल्यास तत्काळ प्रशासनाला कळवावे, असे सूचित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात शेवाळे वाडी परिसरातही बिबट्याचा वावर आढळून आला होता.
वन विभागाकडून परिसरात पाहणी सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या ठिकाणी नदी असल्याने त्या बाजूलाही बिबट्या जाऊ शकतो. त्यामुळे आवश्यक त्या उपयोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी लवकरच योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.