किल्ले तोरणा गडावर बिबटयाचा मुक्त संचार; पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण, व्हिडिओ तुफान व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:48 IST2025-01-20T16:47:18+5:302025-01-20T16:48:37+5:30
भर दिवसा गडाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर तसेच कडेला असणाऱ्या कडे -कपारी गवतामध्ये आणि पर्यटकांच्या पाऊल वाटेवर बिबट्या आढळून येत आहे

किल्ले तोरणा गडावर बिबटयाचा मुक्त संचार; पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण, व्हिडिओ तुफान व्हायरल...
वेल्हे: (ता.राजगड) परिसरात शनिवार (ता.१८) दुपारच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसून आला आहे. याबाबत तोरणा गडावर आलेल्या पर्यटक व नागरिकांनी मोबाईल मध्ये चित्रीकरण केले आहे. गेल्या तीन चार दिवसापासून बिबट्या या परिसरात दिवसा दिसत असल्याने नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
किल्ले तोरणा गडाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग तसेच किल्ले राजगड ते तोरणा ट्रेक करण्यासाठी जवळचा असणारा मार्ग म्हणून मेट पिलावरे मार्गे हजारो पर्यटक गडावर जात असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी डोंगर गवताळ रान असल्याने रस्त्यावर गडाच्या शेजारी वनविभागाच्या हद्दीमध्ये गेल्या तीन चार दिवसा पूर्वीसुद्धा बिबट्याचे पूर्ण वाढ न झालेले पिल्लू दिसून आले होते. याबाबत सुद्धा सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत होता. मात्र तो याच परिसरातील होता की नाही याबाबत शंका निर्माण केली जात होती. मात्र काल किल्ले तोरणा गडावर गेलेल्या काही पर्यटकांनी व स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केल्यानंतर या परिसरामध्ये बिबट्याच्या मादीसह पिल्ले असल्याचे आढळून आले आहे.
मेटपिलावरे मार्गे पर्यटकांच्या येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरच बिबट्या फिरत असल्याचे आढळून आल्याचे स्थानिक नागरिक दीपक पिलावरे, विश्वास पिलावरे, दशरथ जोरकर, सुदाम सांगळे यांनी सांगितले. याचबरोबर बिबट्याचे पिल्लू दिसून आल्याने या परिसरात आणखी किती नर व मादी बिबटे आहेत. याचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याचे येथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्य तानाजी कचरे यांनी सांगितले .
भर दिवसा गडाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर तसेच कडेला असणाऱ्या कडे -कपारी गवतामध्ये तसेच गडावर जाणाऱ्या पर्यटकांच्या पाऊल वाटेवर बिबट्या भर दिवसा आढळून येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना शेतात काम करायला जाण्यास तसेच शाळेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किल्ले तोरणा गडावर बिबट्याचा मुक्त संचार
— Lokmat (@lokmat) January 20, 2025
पर्यटक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण #Pune#torana#fort#leopardpic.twitter.com/j0P8GmaQbf
रात्री अपरात्री या मार्गावर अनेक पर्यटक तोरणागडावर चढाई करत असतात. परिसरामध्ये बिबट्यांची मादी व पिल्ले आढळून आल्याने व याची कल्पना पर्यटकांना नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वनविभागाकडून या परिसराची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
राजगडावरून मेट पिलावरे मार्गे तोरणा गडाकडे जाणारे हजारो पर्यटक ये-जा करत असतात रात्री अपरात्री ट्रेकिंग करत असतात मात्र या परिसरामध्ये बिबटे असल्याचे त्यांना कल्पना नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडू शकते- तानाजी कचरे, ग्रामपंचायत सदस्य, मेटपिलावरे.
या परिसरात बिबट्या दिसून आला असल्याची माहिती मिळली. किल्ल्यावर सुरु असलेल्या कामामुळे कंपाऊंड च्या आत मध्ये बिबट्या अडकला आहे. तो भयभीत झाला असुन तो माणसांना घाबरलेला आहे. लवकरच त्याची सुटका केली जाईल. - वैशाली हाडवळे, वनपाल वेल्हे