काळेवाडी परिसरात बिबट्याचा वावर; परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 18:32 IST2023-08-16T18:31:16+5:302023-08-16T18:32:28+5:30
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे...

काळेवाडी परिसरात बिबट्याचा वावर; परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
देऊळगाव राजे (पुणे) : काळेवाडी (ता.दौंड) येथे बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले असून, येथील शेतकरी रात्री शेताला पाणी देण्यासाठी गेले असता, बिबट्या दिसला. काही दिवसांपूर्वी शिरापूर येथे बिबट्याने शेळ्या खाल्ल्या आहेत. त्यामुळे शिरापूर येथून तो आता काळेवाडी परिसरात वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा वनविभागाकडून लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून पुढे येत आहे. या संदर्भात हिंगणीबेर्डी काळेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीने वनविभागाकडे निवेदन दिले असून, बिबट्याला सापळा रचून पकडण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
काळेवाडी - हिंगणीबेर्डी परिसरात वनविभागाचे क्षेत्र भरपूर प्रमाणात असून, त्यामध्ये पूर्ण काटेरी झाडे-झुडपे असल्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिसर आहे. या भागात प्रथमच बिबट्या आल्याने शेतकरी, नागरिक भयभीत झाला असून, वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.