नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 22:32 IST2024-01-01T21:34:04+5:302024-01-01T22:32:12+5:30
नगर कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याने प्राण गमावल्याची घटना समोर आली आहे

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
ओतूर: नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळमाथा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सोमवार दि.१ जानेवारी रोजी सायकाळी ७.४५ च्या सुमारास बिबट्या ठार झाल्याची माहिती विभागाकडून समजते. जुन्नर तालुक्यात सद्यस्थितीत बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. ओतूर परिसरात गेल्या महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देत वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. त्यात जवळपास कित्येक बिबटे रेस्क्यू करण्यात आले. ओतूर शिवारातही भर दिवसा बिबट्याचा वावर आढळून येत आहे अशातच आता नगर कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याने प्राण गमावल्याची घटना समोर आली आहे
याबाबत स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक एस.एच कुठेकर आणि रेस्क्यू टिम मेम्बर विजय वायाळ यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट उदापुर वृक्षवटिकेत आणण्यात आला. यावेळी ओतूर वनविभागाचे कर्मचारी यांनी सागितले की अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झालेला आहे अंदाजे ६ ते ७ वर्षाचा असून पाहणी केली असता बिबट्याला गंभीर दुखापत झालेली असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मृत नर बिबट्याचा पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.