कांदळीत बिबट्याने केला दुचाकीचालकाचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:12+5:302021-02-05T05:09:12+5:30
पिंपरी पेंढार : कांदळी (ता. जुन्नर) येथील उंबरकासमळा येथे उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकलवर हल्ला करण्याचा प्रयत्न ...

कांदळीत बिबट्याने केला दुचाकीचालकाचा पाठलाग
पिंपरी पेंढार : कांदळी (ता. जुन्नर) येथील उंबरकासमळा येथे उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाठीमागून येणाऱ्या तरूणांनी प्रसंगसावधानता दाखविल्यामुळे ते दोघजण बिबट्याच्या हल्ल्यामधून बचावले आहेत.
बुधवारी ( दि २७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोमनाथ रेपाळे व मंगेश रेपाळे हे दोघेेेेजण मोटारसायकलवरुन जात होते. शिंदेमळा ते उंबरकासमळा या रस्त्यालगत असलेल्या जयसिंह तुकाराम बढे यांच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटारसायकलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान पाठीमागून मोटारसायकलवरुन येणाऱ्या यश घाडगे सौरभ घाडगे मंगेश रोकडे या तिघाजणांनी प्रसंगसावधानता दाखवत आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. हा बिबट्या गेल्या काही दिवसांपासून ऊसातच दबा धरून बसला असल्यामुळे शिंदेमळा ते उंबरकास मळा रस्ता वहातुकीसाठी बंद केला आहे. याबाबत वनखात्याने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
चौकट
या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात दोन बिबटे व दोन बछडे असल्याचे येथील ग्रामस्थांनी पाहिले आहेत. वारंवार त्यांचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. या बिबट्यांच्या दहशतीमूळे येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थ सोमनाथ रेपाळे, मंगेश रेपाळे, यश घाडगे, सौरभ घाडगे, मंगेश रोकडे, शांताराम रेपाळे, सौरभ रेपाळे, संदीप रेपाळे, रोहित रेपाळे यांनी केली आहे.